मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अधिक सतर्क झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेला संबोधित करताना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आणू नका, असं बजावलं होतं. परंतु दोनच दिवसात ठाकरे सरकारवर नाईट कर्फ्यू लागू करण्याची वेळ आली. त्यामुळे रात्रीच्या संचारबंदीच्या पावलांनी मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन येणार का? असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. (Will Night Curfew imposed in Maharashtra lead to Lockdown asks citizens)
नववर्षाच्या जल्लोषावर बंधनं
नवीन वर्ष उंबरठ्यावर आहे. नाताळपासूनच नववर्षाचा जल्लोष सुरु होतो. या काळात नागरिकांकडून हलगर्जी होऊ नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस अनेक जण रात्रभर सेलिब्रेशन करतात. मात्र घराबाहेर एकत्र जमून होणाऱ्या जल्लोषावर मर्यादा यावी, यासाठी अतिरिक्त बंधनं घालण्यात आली आहेत.
युरोपीय प्रवाशांवर निर्बंध
संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात दिवसांसाठी स्वखर्चाने त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण करावे लागेल. तर अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अन्य देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
युके येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ७ दिवसांसाठी स्वखर्चाने जवळच्या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगिकरण करणे अनिवार्य आहे
लक्षणे असलेल्या प्रवाशांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले जाईल
पाचवा व सातवा दिवस, या कालावधीतील आरटी-पीसीआर तपासणीचा खर्च प्रवाशांनी करणे आवश्यक आहे
(२/३)
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 21, 2020
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधित करताना कोरोना संकटावरुन पुन्हा एकदा सावधतेचा इशारा दिला. युरोप आणि इंग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे. कोरोनाची चौथी लाट आली आहे. त्यामुळे सावध राहा. राज्यात कोरोनावर नियंत्रण आहे. 70 टक्के नागरिक मास्क लावून फिरताना दिसतात, ही नक्कीच चांगली बाब आहे. पण अजूनही 30 टक्के लोक मास्क लावत नाहीत. बंधने पाळत नाहीत. तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका, आपल्या आप्तेष्टांच्या जीवाशी खेळू नका. आनंदाला थोडे दिवस बंधन घाला. इलाजापेक्षा काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरा. मास्कला शस्त्र समजा, असंही ते म्हणाले.
नाईट कर्फ्यू लावण्याचे संकेत खरे ठरले
महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट येऊ नये म्हणून मला अनेकांनी लॉकडाऊन करण्याच्या सूचना केल्या. काही लोकांनी नाईट कर्फ्यू लावण्याच्याही सूचना दिल्या. हे मी करु शकतो, पण मला करायचं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. काय करायचं आणि काय नाही हे आपल्याला कळतं. ती वेळ आणू द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुम्हीच स्वत:वर काही बंधने लादून घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र त्यानंतर काही तासातच नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय
(Will Night Curfew imposed in Maharashtra lead to Lockdown asks citizens)