नागपूर : कोविड लाटेत काहींचे आधारवड हिरावले गेले. अशा बालकांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढं यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केलं. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कार्यशाळेत त्या बोलत होत्या. हे आवाहन अधिकारी आता स्वीकारणार का ते पाहावे लागेलं.
नागपूर जिल्ह्यात मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे. यातून कोविड लाटेत पालक गमावलेले बालक व महिलांना आधार मिळणार आहे. महिला व बाल विकास विभाग, विपला फाउंडेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविली जात आहे.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनातर्फे 5 लाखांचे सानुग्रह अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यासोबतच पी.एम. केअरमधून 10 लाखाची मदत लवकरच त्यांना देण्यात येणार आहे. या कामात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयातून कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दुरदृष्य प्रणालीद्वारे आदेश देवून सर्व तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तालुकास्तरावर आठवड्यातून एकदा बैठक घ्यावी. नियमित आढावा घ्यावा व अहवाल सादर करावा, अशा सूचना विमला आर. यांनी दिल्या.
68 बालकांची पी.एम. केअर मध्ये नोंदणी करण्यात आली. तसेच बालकांच्या नावे खाते उघडण्यात येवून 52 बालकांच्या खात्यात 5 लाखांचा धनादेश जमा करण्यात आला आहे. 32 बालकांचे पोस्ट विभागात खाते उघडण्यात आली आहे. 24 प्रकरणांची कार्यवाही सुरु आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मालमत्तेविषयी प्रकरणात मार्गदर्शन करण्यात येत आहे. 161 बालकांना शुल्क माफ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. खाजगी शाळांबाबत शिक्षण विभागातर्फे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 63 अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 44 बालकांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 3 वर्षाखालील बालकांचे रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड महामारीतील पती गमावलेल्या 544 महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मदत देण्यात आली आहे. कौशल्य विभागातर्फे त्यांना प्रशिक्षण देवून रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जन्म-मृत्यू दाखला आदी वाटप करण्यात आले आहे. यासह अजूनही जिल्ह्यात जे बालक आहेत त्यांचा शोध घेवून त्यांच्या पाल्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.