नाशिकः नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र दिल्याचे समजते. (Withdraw the petition against NCP leader Chhagan Bhujbal; Shiv Sena MLA Suhas Kande threatened by underworld don Chhota Rajan gang)
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून ही शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरून तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल, असं सांगितलं. मात्र, दोघांतली खडाजंगी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर भुजबळ यांच्याविरोधात आमदार कांदे यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यात छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. इतकेच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
खरंच, छोटा राजन टोळी सक्रिय?
कांदे यांनी दाखल केलेली याचिका मागे घ्यावी, अशी धमकी देणारा फोन मंगळवारी शिवसेना आमदार सुहास कांदे यांना आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने 9664666676 या क्रमांकावरून दूरध्वनी केला. कांदे यांनी याचिका मागे घ्यावी, अन्यथा आमच्याशी गाठ असल्याची धमकी त्याने दिली. या फोननंतर कांदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देत तक्रार दाखल केल्याचे समजते. एकंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील या जोरदार राजकीय खडाजंगी जिल्ह्यात चवीने चर्चा सुरू आहे. (Withdraw the petition against NCP leader Chhagan Bhujbal; Shiv Sena MLA Suhas Kande threatened by underworld don Chhota Rajan gang)
इतर बातम्याः
गोल्डन ऑफर, सोनं पुन्हा स्वस्त; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!