ठाणे : कल्याणमध्ये एनआरसी कंपनीच्या कामगारांकडून 13 वर्षांची थकीत देणी मिळवण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आज (27 फेब्रुवारी) राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांना आक्रमक आंदोलकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. एका महिलेने सर्वांसमोरच एकनाथ शिंदे यांना आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा तरीही आमची दखल घेण्यासाठी कुणीही का आलं नाही, असा संतप्त सवाल केला. यावर एकनाथ शिंदे यांनी कोणी कितीही मोठा माणूस असो सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा विश्वास उपस्थितांना दिलाय (Women protester publicaly ask question to Eknath Shinde about their salary).
संबंधित महिला एकनाथ शिंदेंना म्हणाली, “13 वर्षे झाले आमचा संघर्ष सुरु आहे. आमच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसून आज 15 दिवस झालेत, परंतु आमदार शिवसेनेचा, पालकमंत्री शिवसेनेचे, मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही आजपर्यंत कुणीही दखल घ्यायला आलं नाही.” यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित महिलेला तुमचा प्रश्न सांगा अशी विचारणा केली.
‘पोलिसांनी महिलांना उचलून गाडीत टाकलं’
यावर त्या म्हणाल्या, “आमची 13 वर्षांपासूनची थकीत देणी आहे, ती मिळावी. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आतापर्यंत आमचा एक रुपयाही दिलेला नाही. एकूण साडेचार हजार कामगार आहेत. यापैकी कुणाचेही पैसे दिलेले नाहीत. आम्ही पोकलन रोखायला गेलो त्यावेळी महिलांवर अत्याचार झाला. पोलिसांनी महिलांना उचलून गाडीत टाकलं. जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करु.”
‘मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार’
एकनाथ शिंदे म्हणाले, “कोणी कितीही मोठा माणूस असला तरी त्याला कामगारांची देणी दिल्याशिवाय पळ काढता येणार नाही. सरकार त्याला पाठिशी घालणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. आमदार विश्वनाथ भोईर यांनी मला माहिती दिली आहे. लवकरच वेळ ठरवून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढला जाईल.”
‘पोलिसांनी कोणतीही बेकायदेशीर कारवाई करु नये’
“पोलिसांनी जे काही कायदेशीर आहे त्या बाजूनेच काम करावं. पोलिसांनी कोणतीही बेकायदेशीर कारवाई करु नये,” अशी ताकीद एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहे.
‘मी येथे या प्रकरणी मार्ग काढायला आलो’
एनआरसी संघर्ष समितीच्या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नव्हता. आज पालकमंत्र्यांनी आंदोलनाला भेट दिली. यावेळी संतप्त महिलेने पालकमंत्र्यांना सवाल केला असता मी येथे या प्रकरणी मार्ग काढायला आलो आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली.
हेही वाचा :
राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा, अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार का? एकनाथ शिंदे म्हणतात…..
आता पोलिसांकरिता विशेष घरं, राज्य सरकारचा विचार : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेही पवारांसारखं म्हणाले, प्रकरणं संवेदनशील आहे !
व्हिडीओ पाहा :
Women protester publicaly ask question to Eknath Shinde about their salary