नाशिकः नाशिकमधील आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादाचा अक्षरशः रतीब सुरू आहे. यामुळे साहित्यकांच्या अगाध ज्ञानाचे उभ्या महाराष्ट्राला दर्शन घडत असून त्याचे एकामागून एक धक्के मात्र, नाशिककरांना सहन करावे लागत आहेत. या घटनांमुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आता यातच संमेलन गीतामध्ये शाहीर प्रताप परदेशी ऐवजी चक्क कुण्या अज्ञाताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे किती ही हेळसांड. आता तुमच्या अगाध ज्ञानाचे दिव्य दर्शन थांबवा, अशीच व्यथित विनंती रसिकांमधून होताना दिसत आहे.
सावरकरांपासून नमन…
साहित्य संमेलनाच्या वादाला खरे तोंड संमेलन गीतामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव वगळल्यामुळे फुटले. मात्र, ही चूक काही केल्या गीतकार मान्य करायला तयार नव्हते. शेवटी माध्यमात त्याच्या बातम्या झाल्या. तेव्हा दबावापोटी आणि नामुष्कीच्या भीतीने हे गीत मागे घेण्यात आले. त्यात बदल करून पुन्हा नवे गीत सादर झाले. या नव्या गीतामध्येही पुन्हा एकेका दिव्यत्वाची अनुभुती येताना दिसत आहे. त्यात झाले असे की, या गीतात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या ऐवजी चक्क नाना शंकरशेठांचे चित्र वापरण्यात आले. विशेष म्हणजे या साहित्य संमेलनाचे निमंत्रकच लोकहितवादी मंडळ आहे. आता बोलणार तरी काय?
ते छायाचित्र कोणाचे?
आता याच संमेलन गीतामध्ये अजून एक घोडचूक निदर्शनास आली आहे. त्यात लोकशाहीर प्रताप परदेशी ऐवजी कुण्या अज्ञाताचे छायाचित्र वापरल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची तक्रार राणा की सेना संघटनेच्या डॉ. वसंत ठाकूर यांनी संबंधितांकडे केली. तसे निवदेन त्यांना दिले. मात्र, त्यांना हे छायाचित्र शाहीर गजाभाऊ बेणी असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे गजाभाऊ बेणी यांचे सुपुत्र श्रीकांत बेणी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता हे छायाचित्र कोणाचे, हा प्रश्न विचारला जातो आहे.
लोकशाहीर बेणींना टाळले
शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांनी एक काळ गाजवला. त्यांच्या कलापथकात शाहीर गजाभाऊ बेणी होते. विशेष म्हणजे नाशिक येथे 1956 मध्ये झालेल्या आंदोलनात ते अग्रेसर होते. आता प्रताप परदेशी हे गजाभाऊ बेणींच्या कलापथकात होते. या प्रताप परदेशी यांचा संमेलन गीतात उल्लेख आहे. मात्र, त्यांच्या नावापुढे कुण्या अज्ञाताचा फोटो लावला आहे. दुसरीकडे बेणींचा साधा उल्लेखही या गीतात नाही. त्यात गीतकार म्हणतात की, आम्ही थोडी सूट घेऊन हे गीत लिहिले आहे. त्यांची कलेविषय सूट नेमकी कोणती, असा सवाल आता नाशिककर विचारत आहेत.
आधी Election सोसायट्यांचे; नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम रद्द