Video Yavatmal | यवतमाळमध्ये ग्रामसभेत ग्रामसेवकाला बेदम मारहाण; ग्रामसेवकाची मारेगाव पोलिसांत तक्रार
या व्हिडीओत चांगलीच झटापट होताना दिसत आहे. ग्रामसेवक खाली पडले आहेत. त्यांना मारहाण करताना एक व्यक्ती दिसत आहेत. बाजूला काही महिला ही मारहाण थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
यवतमाळ : ग्रामपंचायत सदस्य महिला पतीकडून ग्रामसेवकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ (Chinchmandal) येथे घडली. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा सुरू असताना सदस्य महिलेचे पती दिवाकर सातपुते तेथे आले. त्यांनी ग्रामसेवक किशोर खरात (Kishore Kharat) यांच्याशी वाद निर्माण करून धक्काबुक्की केली. तसेच केस पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मारहाणीमुळे मासिक ग्रामसभेत काही वेळासाठी तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडीओत नेमकं काय
या व्हिडीओत चांगलीच झटापट होताना दिसत आहे. ग्रामसेवक खाली पडले आहेत. त्यांना मारहाण करताना एक व्यक्ती दिसत आहेत. बाजूला काही महिला ही मारहाण थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार ग्रामसभा सुरू असताना घडला. या घटनेमुळं मासिक ग्रामसभेत तणाव निर्माण झाला होता. मासिक सभा असल्यानं काही व्यक्ती त्याठिकाणी आहेत. त्यामुळं कुणी सोडा, तर कुणी मारा असं म्हणताना हा व्हिडीओ आहे.
पाहा व्हिडीओ
यवतमाळ्यातील मारेगाव तालुक्यात ग्रामसेवकाची चांगलीच धुलाई करण्यात आली. pic.twitter.com/R4636KwuQI
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 30, 2022
प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर खरात यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किशोर हे चांभार जातीचे आहेत. २९ एप्रिलला चिंचमंडळ येथे मासिक सभा होती. सोबत तुळशीराम डोंगरे, मारोती तोडासे व सतीश बोथले हे ग्रामसभेमध्ये होते. भाग्यश्री सातपुते व दिवाकर सातपुते हे दुपारी सव्वाबारा वाजता ग्रामपंचायतीमध्ये आले. दिवाकर यांनी मी दिलेल्या अर्जावर अजून तुम्ही उत्तर का दिलं नाही, असं विचारलं. त्यावर मिटिंगमध्ये उत्तर देतो, असं सांगितलं. तू मला शिकवतोस का, असं म्हणून दिवाकरनं मला मारहाण केली. शर्टच्या बटन तोडल्या. शिवाय जातीवाचक शिव्या देऊन धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. शिवाय शासकीय दस्तावेजावर लिखाण करून कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली आहे.