यवतमाळ : तीन पट रक्कम देण्याचे आमिष देऊन कलकाम रियल इन्फ्रा कंपनी लिमिटेड या कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारां (Investors)नी अवधूत वाडी पोलिसात आठ जणांविरोधात तक्रार (Complain) दाखल केली आहे. मुंबई येथील विष्णू दळवी रा वाशी, विजय सुपेकर, सुनील वांद्रे, विदेश रामटेके, विजय येरगुडे, दिलीप भोसले, अजय जावडेकर, सचिन पवार, रवी सातपुते अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 8 जणांची नावे आहेत. याप्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
कलकाम रिअल ईनफा (ई) लिमिटेड कंपनीमधील आठ ते दहा जणांनी विदर्भामध्ये कार्यक्रम घेऊन कंपनीमध्ये गंतवणूक करण्यासाठी ग्राहकाला प्रोत्साहित केले. ग्राहकांना गुंतवलेल्या रकमेवर ठाराविक दिवसानंतर तीन पट अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले. तसेच कंपनीने बॉन्ड देखील दिले आहे. काही महिन्यात कंपनीने 100 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये देखील कलकामने आपल्या कंपनीच्या प्रचार व प्रसार करून शेकडो गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. यामध्ये 267 ग्राहकांची 2 कोटी 10 लाख 213 रुपयांची फसवणूक केली.
दरम्यान, आज मुदत उलटूनही सदर कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. गेल्या 2 वर्षापासून फसवणूक झालेले लोक कंपनीच्या मागे फिरत आहे. त्यानंतर आज या कंपनीत काम करणाऱ्या एजंट आणि ग्राहकांनी संबंधित कंपनी विरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीची चौकशी करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे याकरीता, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. पै पै गोळा करून लोकांनी पैसे व्याजदर जास्त मिळण्याच्या लोभापोटी लाखो रुपये यात गुंतवले आहेत. मात्र हे पैसे घेऊन कंपनीने पोबारा केला आहे. कमी गुंतवणुकीमध्ये जास्त व्याजदराचे आमिष देणाऱ्या अनेक कंपन्या सध्या राजरोसपणे सर्वसामान्य लोकांना फसवत आहेत. त्यामुळे ह्या नेटवर्क मार्केटिंग जाळ्यात फसण्याआधी नागरिकांनी शहानिशा करणे गरजेचे आहे आणि सावधान राहणे गरजेचे आहे. अन्यथा आपली सुद्धा फसवणूक होऊ शकते. (Investors cheated of Rs 2 crore by Yavatmal Kalkam Real Infra)