Sanjay Rathod : संजय राठोडांच्या कॅबिनेटमध्ये कमबॅकसाठी बंजारा समाज आक्रमक, आंदोलन न करण्याचं राठोडांचं आवाहन
संजय राठोडांच्या मंत्रिमडळात कमबॅकच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळातच राठोड यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झालीच नाही. ते फक्त एकनाथ शिंदे यांना भेटले, अशीही माहिती समोर आली. तर दुसरीकडे संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे.
यवतमाळ : सोमवारी अचानक माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला (Cm Uddhav Thackeray) गेले असल्याच्या बातम्या आल्या. आणि त्यानंतर संजय राठोडांच्या मंत्रिमडळात कमबॅकच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळातच राठोड यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झालीच नाही. ते फक्त एकनाथ शिंदे यांना भेटले, अशीही माहिती समोर आली. तर दुसरीकडे संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. काही महिन्यांपूर्वी राठोड यांना एका प्रकरणात वनमंत्रीपदाचा राजीनामा (Forest Minister) द्यावा लागला होता. ‘आपला पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा समाजातील संत, महंत आणि संजबांधवांनी कोणत्याही आंदोलनाची भूमिका घेऊ नये’, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी केले आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या आवाहनाला बंजारा समाज कसा प्रतिसाद देतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
23 एप्रिलला आंदोलनाचा इशारा
याबाबत बोलताना संजय राठोड म्हणाले की, ‘बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत समाजाचे मान्यवर महंत आणि समाजबांधवांनी मला पुन्हा मंत्रिपद मिळावे म्हणून 23 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे समाजमाध्यमातून कळले. मात्र समाजबांधवांनी अशी कोणतीही कृती किंवा आंदोलन करू नये, असे राठोड म्हणाले. आपल्यावर समाजातील सर्व संत, महंत, समाजबांधव, नागरिक यांचे अपार प्रेम व आशीर्वाद आहे, याची कृतार्थ जाणीव मला आहे. आपल्यावरील प्रेमापोटी समाजबांधवांनी माझ्या मंत्रिपदासाठी आंदोलनाची ही भूमिका घेतली आहे. मात्र ती समर्थनीय नाही. त्यामुळे समाजबांधव व नागरिकांनी असे कोणतेही आंदोलन राज्यात कुठेही करू नये, असे राठोड म्हणाले.
मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील
शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आपले सलोख्याचे आणि सुसंवादाचे संबंध आहेत. माझा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील हा विश्वास मला आहे. कुठल्या पदावर राहूनच काम करता येते असे नव्हे; तर आमदार म्हणूनही मी पूर्वीप्रमाणेच समाजासाठी कार्यशील आहो, असे संजय राठोड म्हणाले. त्यामुळे मला मंत्रीमंडळात स्थान मिळावे म्हणून समाजातील संत, महंत, समाजबांधवांनी कोणतेही आंदोलन करू नये, अशी कळकळीची विनंती करत असल्याचे आ. संजय राठोड यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Vishwajeet Kadam: साहेब काय चाललंय?; विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांना हसू आवरेना