भरधाव बोलेरो एसटीवर धडकली, अपघात इतका भीषण होता की…
यवतमाळहून नागपुरच्या दिशेने चाललेली एसटी बस कामटवाडाजवळ येताच बोलेरोने मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल.
यवतमाळ / विजय गायकवाड : चालकाचा भरधाव वेगातील वाहनावरील ताबा सुटल्याने मालवाहू बोलेरो वाहन एसटीला धडकले. ही धडक एवढी भीषण होती की, यात बसच्या एका बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी बोलेरो चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरु आहे.
नागपूरच्या दिशेने चालली होती एसटी
एसटी महामंडळाची बस यवतमाळहून नागपूरच्या दिशेने चालली होती. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास यवतमाळच्या कामटवाडाजवळ बोलेरो वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर बोलेरो वाहन पुढे चाललेल्या एसटीला जोरदार धडकले. या धडकेत एक 8 वर्षाची आणि एक 11 वर्षाची मुलगी जागीच ठार झाले, तर 15 प्रवासी जखमी झाले. अपघातात बसची उजवी बाजू संपूर्ण क्षतिग्रस्त झाली.
जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
अपघाताची बातमी मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि लाडखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. बोलेरो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई करत आहेत.