कॉलेजला सुट्टी असल्याने सर्व मित्र तलावावर पोहायला गेले, मात्र दोघा मित्रांची ही शेवटची अंघोळ ठरली !
राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. उकाड्याने सर्वजण हैराण झाले आहेत. त्यातच सध्या उन्हाळी सुट्टी सुरु असल्याने विद्यार्थी वर्ग मित्रांसोबत नदी, तलावावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.
विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ : सध्या शाळा, कॉलेजला उन्हाळी सुट्ट्या आहेत. यामुळे बहुतेक मुले गावाकडे किंवा कुठेतरी पिकनिक स्पॉटला जाणे पसंत करतात. सध्या राज्यात तापमानाचा पारा चढला असल्याने, उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. यामुळे शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नदी, तलावात पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या आनंदावर विरजण पाडणाऱ्या घटनाही उजेडाच येत आहेत. अशाच दोन घटना आज उघडकीस आल्या आहेत. दोन विविध घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या ग्रामीण भागात घडली.
दुहेरी घटनेत तिघांचा मृत्यू
यवतमाळ येथे पॉलिटेक्निक कॉलेजला शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. ऋषभ बजाज आणि सुजय काळे अशी मयत तरुणांची नावे आहेत. ऋषभ यवतमाळमधील कापरा येथील तर सुजय नागपूर येथील रहिवासी आहे. दुसऱ्या घटनेत यवतमाळच्या टाकळी येथील तलावात बुडून 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
कॉलेजला सुट्टी असल्याने सर्व मित्र पोहायला तलावावर गेले
सुजय हा यवतमाळ येथे पॉलिटेक्निक कॉलेजला वस्तीगृहात राहत होता. ऋषभ आणि सुजय हे दोघेजण कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या अन्य मित्रांसोबतच पोहण्याचा आनंद घेण्यासाठी कापरा येथे तलावात पोहण्यासाठी गेले होते. ऋषभ पोहता पोहता बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी सुजय गेला. मात्र त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग, एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी दाखल होत तरुणांचा शोध सुरु केला. ऋषभचा मृतदेह सापडला असून, सुजयचा मात्र शोध सुरू आहे. तर टाकळी येथील 14 वर्षीय मुलाचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. NDRF पथकाने शोधा शोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला. जिल्ह्यात घडलेल्या दोन्ही घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.