यवतमाळ : शहरातील धामणगाव बायपास (Dhamangaon Bypass) मार्गावर एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिचा गळा चिरून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न (Attempted Murder) करण्यात आला. अनैतिक संबंधामधून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मारेकरी प्रियकरास अटक केली आहे. यवतमाळ शहरातील धामणगाव बायपास धारीवाल रेसिडेन्सी च्या मागील बाजूच्या वीट भट्टीजवळ ही थरारक घटना उघडकीस आली. एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे (City Police Station) गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक 35 वर्षीय महिला रक्तात थारोळ्यात पडली असल्याचे दिसले. त्यावेळी तिचा गळा धारधार शस्त्राने चिरला असल्याचे लक्षात आले.
यवतमाळातील गोदाम फैल येथील अर्चना क्षीरसागर असं जखमी महिलेचं नाव आहे. तिला पोलिसांनी यवतमाळ च्या शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केले. दरम्यान अर्चनावर हा हल्ला कोणी केला का केला हे प्रश्न निरुत्तर होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अर्चना क्षीरसागर हिचा प्रियकर नेताजी नगरातील शाहरुख खान बहादूर खानचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता शाहरुखचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होते.
अर्चना ही विवाहित असून ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. शाहरुखसोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू होते. दरम्यान अर्चना गेल्या काही दिवसांपासून शाहरुखपासून दूर होती. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ती भेटण्यास ही नकार देत होती. माझे दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू असल्याची कबुली तिने शाहरुखला दिली. या बाबीचा राग मनात ठेवून शाहरुखने अर्चनाला यवतमाळच्या स्टेट बँक चौकात बोलावलं. गाडीवर बसवून वीटभट्टी परिसरात नेले. तिथं दोघे बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी शाहरुखने रागाच्या भरात आपल्या खिशात आणलेल्या कटरने सरळ अर्चनाचा गळा चिरला.
ती रक्ताच्या थोराड्यात पडली होती. शाहरुखने तिथून पलायन केले. आज यवतमाळ शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शाहरुखला अटक केली. अनैतिक संबंधाला नकार अर्चना देत होती. त्यामुळे मारल्याची कबुली शाहरुखने पोलिसांना दिली आहे. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सपोनि जनार्धन खंडेराव अजय डोळे, प्रदीप नाईकवाडे, सूरज साबळे, निलेश भुसे, कमलेश भोयर, संतोष व्यास यांनी केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. जखमी महिला ही रुग्णालयात उपचार घेत आहे.