Yavatmal Rain | पावसाचं रौद्र रुप, 80 जण अडकले, यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरने थरारक रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: Jul 22, 2023 | 5:53 PM

हवाईदलाचं हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचलं आहे. हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर हवेत आता घिरट्या मारत आहेत. तर एक हेलिकॉप्टर हायवेवर खडगा गावावर उतरलं आहे. 

Yavatmal Rain | पावसाचं रौद्र रुप, 80 जण अडकले, यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरने थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Follow us on

यवतमाळ | 22 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अतिशय भयानक परिस्थिती आहे. जिल्ह्यातील वाघाडी गावात पूर आलाय. तसेचल यवतमाळच्या आनंदनगर महागावात पुराच्या पाण्यात 80 लोक अडकले आहेत. या 80 जणांचं रेस्क्यू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आता हवाईदलाचं हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचलं आहे. हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर हवेत आता घिरट्या मारत आहेत. तर एक हेलिकॉप्टर हायवेवर खडगा गावावर उतरलं आहे.

यवतमाळच्या बेंबळा धरणाचे 10 दरवाचे उघडले आहेत. तसेच जिल्ह्यातील पूस नदीला पूर आला आहे. त्यामुळे महागावाला पुराचा वेढा बघायला मिळतोय. गावातील तब्बल 80 गावकरी अडकले आहेत. या अडकलेल्या नागरिकांमध्ये लहान मुलं, महिलांचा समावेश आहे. गावकऱ्यांचं सुरुवातीला तिथे असलेल्या छोट्या रस्त्याने रेस्क्यू केलं जात होतं. या गावकऱ्यांचंल हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू केलं जात आहे.

घरांमध्ये पाणी शिरलं, गावकरी भयभीत

पूस नदीला मोठा पूर आल्याने घराघरांत पाणी शिरलं आहे. घरात राहणं खूप कठीण बनलं आहे. त्यामुळे नागरिकांना आपलं घर-दार, गाव जागेवर सोडून सुरक्षित स्थळी जावं लागत आहे. अनंदनगर महागाव हे पूस नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे. तिथे सर्व गावकरी अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाघाडी आणि पैनगंगा नदीला देखील पूर आला आहे.

हे सुद्धा वाचा

यवतमाळमध्ये 240 मिमी पाऊस

यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यामातून सर्व गावकऱ्यांचं रेस्क्यू केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यवतमाळमध्ये आज जवळपास 240 मिमी पाऊस पडला. वेगवेगळ्या तालुक्यातून 5 हजार पेक्षा जास्त नागरिकांची सुरक्षित स्थळी हलवलं आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पुराच्या पाण्याच अडकलेल्या 200 नागरिकांना जिल्हा पथक आणि एसडीआरएफच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू केलं आहे”, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

“आता आनंदरच्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू केलं जात आहे. पूस आणि पैनगंगा नदीचा तिथे संगम आहे. तसेच तिथे एक नाला आहे. तिथले काही नागरीक आमच्या संपर्कात आहे”, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, महागाव येथे हेलिकॉप्टर येथे पोहोचलं आहे. हे हेलिकॉप्टर गावाच्या वरती घिरट्या घालत आहेत. गावात किती जण आहे याचा अंदाज बांधला जात आहे. त्यानंतर एक व्ह्यूरचना आखून लगेच सर्व जणांचं रेस्क्यू केलं जाणार आहे.गावकऱ्यांना घराच्या छतावर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तिथून त्यांना रेस्क्यू केलं जाणार आहे. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर हवेत घिरट्या मारत आहेत.