मुंबईः हिंदुत्व आणि शिवसेना (Shivsena) टिकवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत राहणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मांडली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे जे समाजकारण आणि राजकारण करतात, त्यांना आपलसं करणार असल्याची भूमिका शिंदे गटानं मांडली आहे. भाजपने पूर्वीपासूनच हिंदुत्वाचा (Hindutwa) अजेंडा राबवलाय. यातूनच शिंदे गट आणि भाजपची युती झाल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते कोण, या प्रश्नाचं उत्तर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे रामदेव बाबांनी या दोन नेत्यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांनी काल सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा झाल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा आणि भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांशी झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. भेटीत नेमकं काय झालं हे सांगताना रामदेव बाबा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदु धर्म, सनातन धर्माचे गौरवपुरुष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते सनातन धर्मही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमचे आत्मीयतेचे संबंध होते. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, अध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, या भूमिकेतून आम्ही पाहतो. त्यामुळे या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठीही प्रयत्न करा, अशी आम्ही विनंती केल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं.