मी काय तुमचा नवरा आहे का?’, तुम्ही छपरी मुली… विद्यापीठात विद्यार्थीनींशी गैरवर्तन; योग गुरुला चोपला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका ‘योगी बाबा'ने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले आणि तो त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलल्याचे उघड झाले. त्याचे हे कृत्य समोर येताच त्याला चांगलाच इंगा दाखवण्यात आला आहे. विद्यार्थिनींशी बोलताना अश्लील भाषा वापरणाऱ्या त्या भोंदू योगाबाबाची दुकानदारी बंद करण्यात आली असून त्याला चोपही देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका ‘योगी बाबा’ने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले आणि तो त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलल्याचे उघड झाले. त्याचे हे कृत्य समोर येताच त्याला चांगलाच इंगा दाखवण्यात आला आहे. विद्यार्थिनींशी बोलताना अश्लील भाषा वापरणाऱ्या त्या भोंदू योगाबाबाची दुकानदारी बंद करण्यात आली असून त्याला चोपही देण्यात आला. बाबाजी नावाच्या योगगुरूला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे राहुल वडमारे यांनी मारहाण करत सज्जड दम भरला.
विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचे प्रशिक्षण देणारा हा बाबा आपण दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा तर करत होता. तसेच प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील भाषेत त्यांचा पाणउतारा करत होता. अखेर त्याला धडा शिकवण्यात आला. तसेच विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून या भोंदू बाबाला योगवर्ग घेण्याची परवानगी देणारे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षण किरण शूरकांबळे रडारवर आले असून त्या दोघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. न्यूजटाऊनने या योगी बाबाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश बुधवारी केला होता.
काय आहे प्रकरण ?
विद्यापीठाच्या क्रीडा विभागात गेल्या एक ते दीडवर्षापासून या ‘योगी बाबा’चे योगवर्ग अनधिकृतपणे सुरू आहेत. आपण योगाद्वारे मायग्रेन, लकवा यासारखे दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा हा योगीबाबा करत होता. एका महिलेच्या मुलाला चालताही येत नव्हते परंतु आपल्या योगविद्येमुळे तो मुलगा चालायला लागला, असे दावा करत त्या भोंदूबाबाने विज्ञानालाच आव्हान दिले. त्याच्या दाव्याला पुष्टी करणारी एक महिलाही त्याच्यासोबत होती.
त्यांचे नाव ऐकून आठवडाभरापूर्वी विद्यापीठातील काही विद्यार्थिनी या ‘योगी बाबा’च्या योगवर्गात प्रशिक्षणासाठी जायला लागल्या होत्या. पण या विद्यार्थिनींना मात्र तेथे वेगळाच अनुभव आला. तुमचे नखरे सहन करायला मी काय तुमचा नवरा आहे का?’, ‘तुम्ही छपरी मुली आहात…’ अशा अश्लील शब्दात तो योगगुरू मुलींशी बोलत होता. विद्यार्थिनींनी त्यावर आक्षेप घेत त्याला भाषा आणि वर्तन नीट ठेवायला सांगितले. मात्र तरीही त्याचे हे उद्योग सुरूच होते.
अखेर संतापलेल्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांना आपबिती सांगितली. मग काही कार्यकर्ते घेऊन वडमारे जाब विचारण्यासाठी पोहोचले. त्यांनी या ‘योगीबाबा’ला जाब विचारला. तेव्हा तो निर्लज्जपणे बोलला आणि आपण तसेच बोलल्याचे कबूल केले. अखेर वडमारे यांनी त्या बाबाच्या कानशिलात लगावून धडा शिकवला.