REVIEW : ‘बाबो’..! कशासाठी हा अट्टाहास?
मराठी सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. हिंदीतही अनेक बड्या निर्मात्यांना मराठी सिनेमाची भूरळ पडतेय. आपणही आपल्या सिनेमाबद्दल अनेक बाता मारु लागलो आहोत. मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्याही चांगलीच वाढली आहे. पण या सगळ्या भाऊगर्दीत बोटावर मोजण्या इतकेच चांगले चित्रपट येतात, बाकी सगळा ‘आनंदी-आनंद गडे’ प्रकार सुरु असतो. असे सिनेमे बघितल्यावर याचसाठी का हा अट्टहास? हा प्रश्न पडल्याशिवाय […]
मराठी सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. हिंदीतही अनेक बड्या निर्मात्यांना मराठी सिनेमाची भूरळ पडतेय. आपणही आपल्या सिनेमाबद्दल अनेक बाता मारु लागलो आहोत. मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्याही चांगलीच वाढली आहे. पण या सगळ्या भाऊगर्दीत बोटावर मोजण्या इतकेच चांगले चित्रपट येतात, बाकी सगळा ‘आनंदी-आनंद गडे’ प्रकार सुरु असतो. असे सिनेमे बघितल्यावर याचसाठी का हा अट्टहास? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. रमेश चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ हा नवा मराठी चित्रपटही याच पठडीत मोडतो. उत्तम कथा, तगडी कलाकारांची फौज असली तरी चित्रपटाची कशी माती होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा.
एका गावातील इरसाल पात्रांभोवती या सिनेमाची कथा फिरते. बबलू (अमोल कांगणे) आणि मुन्नी (प्रतिक्षा मुणगेकर) यांचं एकमेकांवर प्रेम असतं. परंतु दोघांची जात वेगळी असल्यानं त्यांच्या घरच्यांचा याला विरोध असतो. मुन्नीचे वडील भास्कर (सयाजी शिंदे) गावातील धनाढ्य व्यक्तीमत्त्व तर बबलूचे वडील मदन (किशोर कदम) गरीब. भास्कर एकदिवस मुन्नी आणि बबलूला रंगेहाथ पकडतो आणि बबलूला आता धडा शिकवायचाच हा विडा उचलतो. तर दुसरीकडे मदनही पोराच्या पाठी भक्कमपणे उभा राहत भास्करविरोधात जुळवाजुळव करायला सुरुवात करतो. भास्कर आणि मदनची सो कॉल्ड ‘गँग’ एकमेकांवर हल्ला करणार इतक्यात गावात एक बातमी येऊन धडकते. एक यान पृथ्वीच्या दिशेने येतंय आणि ते आपल्याच गावावर कोसळणार आहे. जर यान गावावर कोसळलं तर संपूर्ण गाव बेचिराख होईल हे कळताच गावात हाहाकार माजतो. आता यान खरंच गावात कोसळतं का? मुन्नी आणि बबलूचं लग्न होतं का? गावकरी या संकटाला कसं सामोरं जातात? या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला ‘बाबो’ हा सिनेमा बघितल्यावर मिळतील.
डोंगरा जवळील या छोट्यशा गावात गावकरी छोट्या छोट्या गोष्टींवरुन सतत भांडत असतात. पण जेव्हा गावावर संकट आल्याची माहिती त्यांना मिळते तेव्हा हे सगळे एकत्र येऊन संकटाला सामोरं जाण्यासाठी उभे राहतात. खरेतर चित्रपटाची ही संकल्पना उत्तम होती. पण ती फुलवण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवत राहतो. सयाजी शिंदे, किशोर कदम, किशोर चौघुले असे हुकमाचे एक्के असतांना त्यांचा हवा तसा वापर दिग्दर्शकाने का केला नाही हा प्रश्न मला पडला आहे. रमेश चौधरी या तरुण दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. दिग्दर्शनासोबतच पिंट्या ही व्यक्तिरेखाही त्याने साकारली आहे.
कदाचित रमेशच्या ‘कोवळ्या’ खांद्यावर अभिनय आणि दिग्दर्शन ही दुहेरी जबाबदारी आल्यामुळे तो हा डोलारा सांभाळू शकला नाही. चित्रपटात बऱ्याच ठिकाणी अनेक गमतीशीर प्रसंग फुलवण्याची संधी होती, पण हा चित्रपट सपाट खेळपट्टीवर दिशाहीन गोलंदाजी करुन दमलेल्या गोलंदाजासारखा एकाच दिशेने सुरु राहतो. दिग्दर्शकाला हे लक्षात कसं नाही आलं याचचं आश्चर्य वाटतं. काही प्रसंग आणि पात्र तर उगाच घुसवल्यासारखी वाटतात. अरविंद जगताप यांनी कथा-पटकथा-संवाद लिहिले असल्यामुळे साहजिकचं सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली होती, मात्र जगताप यांनीही फक्त पाट्या टाकण्याचं काम केलं.
सिनेमातील एकही संवाद लक्षात राहत नाही. ताणलेले प्रसंग, कथेच्या मांडणीत नसलेली एकसूत्रता, उगागचच विनोदी निर्मिती करण्याचा केला गेलेला केविलवाणा प्रयत्न यामुळे हा प्रवास खरंच कंटाळवाणा वाटतो. बरेच प्रसंग तर सिनेमात का होते हा प्रश्न मला अजूनही सतावतोय.
चित्रपटात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारं नुकसान यावर उत्तम भाष्य करण्यात आलंय. चित्रपटात दोन गाणी आहेत. त्यातलं एकही गाणं लक्षात राहत नाही. ‘म्याड रं’ हे गाणं तर उगीच घुसवल्यासारखं वाटतं. हा सगळा पोरखेळ बघून गाणं तर हवं पण गाण्यासाठी कथेत जागा नाही, मग द्या कुठेतरी घुसवून हा तर दिग्दर्शकाचा हेतू नाही ना असं वाटणं साहजिकचं आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही विशेष नाही.
सयाजी शिंदे आणि किशोर कदम यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. मधुच्या भूमिकेत किशोर चौघुलेही भन्नाट. दिग्दर्शक रमेश चौधरी या तिन्ही कलाकारांचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करुन घेऊ शकले नाहीत हे दुर्दैव. या सिनेमाच्या निमित्तानं निर्माता अमोल कांगणेनं रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्याने साकारलेला बबन ठिकठाक. प्रतिक्षा मुणगेकर मुन्नीच्या भूमिकेत लक्षात राहते. निशा परुळेकर, जयवंत वाडकर आणि भारत गणेशपुरेला तर सिनेमात पूर्णपणे वाया घालवलंय. रमेश चौधरीने साकारलेला पिंट्या उगाचच विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. रमेशनं फक्त दिग्दर्शनावरचं लक्ष केंद्रित केलं असतं तर कदाचित एक चांगला सिनेमा होऊ शकला असता.
एकूणच काय तर चांगली स्टारकास्ट, उत्तम कथा यामुळे ‘बाबो’ हा सिनेमा चांगला असेल असं वाटलं होतं. पण दिग्दर्शकाचा नवखेपणा संपूर्ण चित्रपटभर जाणवत राहिल्यामुळे चांगल्या कथानकाचा बोऱ्या वाजला आहे. या सिनेमात ना विनोदनिर्मिती आहे, ना इमोशन्स. हा सिनेमा बघितल्यावर कदाचित तुम्हीसुध्दा म्हणाल ‘बाबो’ ! काय सिनेमा आहे ?
टीव्ही नाईन मराठीकडून या सिनेमाला मी देतोय दीड स्टार्स…