Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MOVIE REVIEW PAGALPANTI : वेडेपणाचा कळस ‘पागलपंती’

जॉन अब्राहम, अनिल कपूर, अर्शद वारसी, इलियाना, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, पुलकित सम्राट, झाकीर हुसैन, अशोक समर्थ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला असे एकापेक्षा एक रथी-महारथी...सोबतीला अनिस बझ्मीचं दिग्दर्शन.

MOVIE REVIEW PAGALPANTI : वेडेपणाचा कळस 'पागलपंती'
Follow us
| Updated on: Nov 22, 2019 | 8:43 PM

मुंबई : जॉन अब्राहम, अनिल कपूर, अर्शद वारसी, इलियाना, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, पुलकित सम्राट, झाकीर हुसैन, अशोक समर्थ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला असे एकापेक्षा एक रथी-महारथी…सोबतीला अनिस बझ्मीचं दिग्दर्शन. हा विचार करुन जर तुम्ही ‘पागलपंती’ (Pagalpanti movie review) बघायला जाणार असाल तर जरा थांबा. या सिनेमात जॉन अब्राहमच्या तोंडी एक संवाद आहे, ‘जरुरी नही हर चिज का कोई मतलब हो’. हा संवाद या सिनेमाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.

कुठलाही सेन्स नाही, लॉजिक नाही, व्हिजन नाही..फक्त डझनभर कलाकार घेतले..परदेशातल्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्तथरारक चेसिंग सिक्वेन्स दाखवले, पाण्यासारखा पैसा ओतला की झाला सिनेमा, हा बॉलिवूडकरांचा समज दूर व्हायचं काही नाव घेत नाहीये बुवा ! अहो, अजून ‘हाऊसफुल 4’चा हँगओव्हर उतरला नाहीये त्यातच आता लगेचच ‘पागलपंती’ला पण झेलायचं, हा तर निव्वळ मायबाप प्रेक्षकांवर अन्याय आहे. नो एन्ट्री, सिंग ईज किंग, वेलकमसारखे धमाल सिनेमे दिलेल्या अनीस बझ्मी यांना या चित्रपटात सूर गवसलेला नाही. या सिनेमातही काही सीन आहेत जे तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडतात. पण चित्रपटाची कथा कमकुवत असल्यामुळे शेवटी पदरी निराशाच पडते. संपूर्ण चित्रपट तुकड्या तुकड्यात विखुरलेला (Pagalpanti movie review) वाटतो. त्याशिवाय अनेक अनाकलनीय प्रसंगांची पेरणी केल्यामुळे ‘पागलपंती’ निराश करतो.

ही कथा आहे जंकी(अर्शद वारसी), चंदू(पुलकित सम्राट) आणि राजकिशोर(जॉन अब्राहम)ची. सिनेमाच्या सुरुवातीलाच जंकी आणि चंदू आपल्या आईवडिलांचा पैसा राजकिशोरच्या सांगण्यावरुन एका बिझनेसमध्ये लावतात. पण त्यात त्यांना खुप मोठा तोटा होतो. राजकिशोरला साडेसाती असल्यामुळे हा तोटा झाल्याचं त्यांना त्यांचा फॅमिली पंडित सांगतो. एवढचं काय तर राजकिशोर ज्या बँकेत जॉबला लागतो त्या बँकेचे 32 हजार कोटी घेऊन बिझनेसमॅन नीरज मोदी(इनामुल्लाहक) फरार होतो. त्यामुळे राजकिशोर सगळ्यांसाठीच अनलकी असल्याचं सिध्द होतं.

आता हे त्रिकूट अजून एक नवा बिझनेस सुरु करण्याचं ठरवतं. यामध्येपण त्यांना तोटा सहन करावा लागतो. बरं यावेळेस फक्त ह्या त्रिमुर्तीलाच तोटा होत नाही, तर त्यांच्यामुळे राजासाहब (सौरभ शुक्ला) आणि त्याचा साला वायफाय (अनिल कपूर)लाही सात कोटींचा फटका बसतो. याची शिक्षा म्हणून राजासाहाब आणि वायफाय या त्रिमुर्तीला आपल्या घरी नोकर म्हणून ठेवतात. पण इथेही राजकिशोरची साडेसाती संपत नाही. जंकी, चंदू आणि राजकिशोरमुळे राजासाहाब आणि वायफायवर रस्त्यावर यायची वेळ येते. एवढचं नाही तर त्यांचे शत्रूही त्यांच्या जीवावर उठतात. मग होतं खूप सारं कन्फ्यूजन. आता या सगळ्यातून ही मंडळी बाहेर कशी पडतात? राजकिशोरला नीरज मोदी सापडतो का? असं काय होतं ज्यामुळे राजासाहाब आणि वायफाय रस्त्यावर येतात ? त्यांचे शत्रू कोण असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘पागलपंती’ बघावा लागेल.

सिनेमाची सुरुवात धमाल दृश्यानं होते. त्यामुळे आपण ही ‘पागलपंती’ एन्जॉय करु असा आपला भ्रम तयार होतो. पण जसजसा हा सिनेमा पुढे सरकतो तुम्हाला डोकं आपटून घ्यावसं वाटतं. इतका हा सिनेमा विस्कळीत आहे. सिनेमात असंख्य एकापेक्षा एक मुर्ख पात्र आहेत. या सिनेमात अनिस बझ्मी आणि त्यांच्या लेखकांच्या टीमनं एकाच वेळेस सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मोठ्या पडद्यावर चाललेला हा धांगडधिंगा बघून कन्फ्यूजन वाढत जातं. गाड्यांचे चेसिंग सिक्वेन्स, क्लायमॅक्सला आफ्रिकन सिंहाची एण्ट्री हे काही प्रसंग मस्त जुळून आलेत. पण मुळातचं कथा विस्कळीत असल्यामुळे याचा काहीएक फायदा होत नाही. चांगला सिनेमा बनवण्यासाठी लॅव्हिशनेस असून चालत नाही तर उत्तम आणि सशक्त कथा ही लागते. अनिस बझ्मींनी आता हे समजून घ्यायला हवं. प्रत्येक वेळेस तगडं प्रमोशन, डझनभर कलाकारांची फौज सिनेमा तारत नाही. सिनेमातल्या काही बाळबोध प्रसंगांची पेरणी टाळली असती तर बरं झालं असतं. एवढचं काय तर सिनेमाच्या शेवटी एकदम देशभक्तीच्या ट्रॅकवर जाणं म्हणजे केवळ हास्यापद आहे. अनिल कपूर, सौरभ शुक्ला, अर्शद वारसीसारख्या कलाकारांकडून अजून चांगलं काम करुन घेता आलं असतं. हा सगळा कारभार पाहता दिग्दर्शक म्हणून अनिस बझ्मींनी केवळ पाट्या टाकण्याचं काम केलंय असंच म्हणावं लागेल. तब्बल 2 तास 40 मिनिटांच्या या सिनेमाशी तुम्ही कनेक्ट नाही होत. सिनेमाची लांबी अजून कमी करता आली असती.

सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. परदेशातली डोळ्यांचे पारणं फेडणारी लोकेशन्स उत्तमरीत्या चित्रीत करण्यात आलीयेत. या सिनेमात अनिल कपूर पुन्हा एकदा गँगस्टार भाईच्या भूमिकेत दिसलाय. त्यांच्याकडून अजून चांगलं काम काढून घेता आलं असतं. जॉन अब्राहम राजकिशोरच्या भूमिकेत बऱ्याच ठिकाणी लाऊड वाटतो. अर्शद वारसीचे अनेक वन लायनर पंचेस भन्नाट आहेत. त्याला सिनेमात अजून स्पेस मिळायला हवी होती. पुलकित सम्राटनं चार्मिंग चंदूच्या भूमिकेत जान आणण्याचा प्रयत्न केलाय. सौरभ शुक्ला या सिनेमातील मॅन ऑफ द मॅच. त्यांनी संपूर्ण सिनेमात उत्तम बॅटिंग केलीय. डझनभर कलाकारांमध्ये तेच सगळ्यात जास्त भाव खाऊन जातात. इलियाना, क्रिती, उर्वशी तिन्ही नायिकांकडे सिनेमात विशेष करण्यासारखं काही नाही. मोजकेच दृश्य त्यांच्या वाट्याला आलेत. इलियानाचा कॉमिक टायमिंग उत्तम आहे. निदान तिला तरी अजून स्क्रिन प्रेझेन्स द्यायला हवा होता. उर्वशीचं पात्र सिनेमात उगाच घुसवल्यासारखं वाटलं. नीरज मोदीचं पात्र नीरव मोदीवरुन घेतलेल आहे. नीरज मोदीच्या भूमिकेत इनामुल्लाहक परफेक्ट बसलाय. बाकी मुकेश तिवारी, झाकीर हुसैन, अशोक समर्थ यांच्या वाट्याला विशेष करण्यासारखं काही नाही.

‘पागलपंती’सिनेमातील संगीत हा अजून एक कमकुवत दुवा. सिनेमाची लांबी वाढवण्यासाठी गाणी सिनेमात वापरण्यात आलीये का असा प्रश्न साहजिकचं पडतो. कारण नको त्या ठिकाणी गाण्यांची पेरणी करण्यात आलीये. सलमान खानचं हिट गाणं ‘तुम पर हम अटके यारा’मध्ये जुन्या गाण्यासारखी मजा नाही. ‘बीमार दिल’ गाणं मात्र मस्त जुळून आलं आहे.

एकूणच काय तर तगडे कलाकार, उच्च निर्मिती मुल्य, ग्लॅमरस नायिका, उत्तम वनलायनर, भन्नाट चेसिंग सिक्वेन्स असूनही ‘पागलपंती’ तुम्हाला निराश करतो. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय दोन स्टार्स.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.