शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली : अब्दुल सत्तार
राजीनामा नाट्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई : “शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी काही ‘हितचिंतकांनी’ माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली. मात्र, हा सर्व प्रकार थांबावा यासाठी आज मी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे (Abdul Sattar meet Uddhav Thackeray) यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. उद्धव ठाकरेंनी माझं बोलणं ऐकूण घेतलं. यानंतर आता उद्धव ठाकरे इतर लोकांना बोलावणार आहेत. त्या लोकांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील”, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी आज (5 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली (Abdul Sattar meet Uddhav Thackeray). जवळपास 20 मिनिटे उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा शनिवारी सुरु झाली. मात्र, शनिवारी संध्याकाळी अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन या माहितीचे खंडन केले. त्यानंतर आज सकाळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ‘पक्षातील किंवा पक्षाबाहेरील काही लोक आहेत जे अशाप्रकारच्या पुड्या सोडत आहेत. शिवसेनेची बदनामी व्हावी, यासाठी त्यांचे हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हे सर्व थांबवण्यासाठी मी या संदर्भातील संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे’, असे सत्तार म्हणाले.
“मी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा द्यायचा असता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असता. परंतु, काही लोकांनी पुड्या सोडण्याचं काम केलं आहे. पुड्या सोडणाऱ्यांबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल. या अशाप्रकारच्या पुड्या का सोडल्या? याबाबत शहानिशा केली जाईल. मी उद्या पुन्हा पाच वाजता ‘मातोश्री’वर येईल”, अशी माहिती सत्तार यांनी दिली. दरम्यान, राज्यमंत्रीपदाबाबत सत्तार नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्याला चांगला किंवा वाईट ठरवण्याचा अधिकार मला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही, असे सत्तार यांनी स्पष्ट केलं.