स्वत:ची काळजी घ्या, सरकार तुमच्या पाठीशी, अनिल देशमुखांचं पोलिसांना आवाहन
कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं (Anil Deshmukh on Police Safety during Corona).
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलिस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलिस अत्यंत उत्तम रितीने काम करत आहेत. अशावेळी कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं (Anil Deshmukh on Police Safety during Corona). तसेच सरकार नेहमीच तुमच्या पाठीशी असेल, असा विश्वासही देशमुख यांनी पोलिसांना दिला. मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) आणि स्पेशल प्लास्टिक मास्क वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले, “राज्यातील पोलिस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन 16-16 तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फत पोलिसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्य सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. ही बाब महत्वपूर्ण आणि अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास त्याचा आरोग्याच्या सुरक्षेसाठी नक्कीच अधिक फायदा होईल.”
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, सदर काम करताना त्यांचा कोरोना रुग्णांशी व जनतेशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना आज विशेष मास्क, मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.#MaharashtraGovtCare pic.twitter.com/YPt88jSSyG
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 4, 2020
कोरोनामुळे जर कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटूंबियांसाठी शासनाने 50 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. शासन पूर्णपणे पोलिसांच्या पाठीशी उभे आहे, याबद्दल पोलिस आयुक्त परमविरसिंह यांनी शासनाचे आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले.
मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फत 10 हजार सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. त्याची प्रातिनिधीक सुरुवात गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमविरसिंह, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चोबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज, उपायुक्त (मुख्यालय) एन. अंबिका, उपायुक्त (संचलन) प्रणय अशोक, उपायुक्त (झोन 1) संग्रामसिंह निशानदार, उपायुक्त (झोन 2) राजीव जैन, उपायुक्त (एस.बी. 1) गणेश शिंदे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या : …तरच 14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊन निर्बंधांवर पुनर्विचार : राजेश टोपे
Corona LIVE : बीडमध्ये लॉकडाऊन दरम्यानही माजी मंत्र्यांचा कुटुंबासह प्रवास
पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांना अद्दल, 5,930 वाहनं जप्त, तर 2,727 जणांवर गुन्हा दाखल
धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा : अजित पवार
Anil Deshmukh on Police Safety during Corona