तुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांना मेसेज करुन तक्रार केली. शिवाय याबाबत आपल्याला काय वाटतं, असंही विचारलंय.
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीवर प्रतिक्रिया देणं चांगलंच महागात पडलं. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर अंजली दमानिया (Anjali Damania) यांना ट्रोल केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांना मेसेज करुन तक्रार केली. शिवाय याबाबत आपल्याला काय वाटतं, असंही विचारलंय.
“नमस्कार मी सौ अंजली दमानिया, आज मी आपल्याविरुद्ध एक ट्वीट केलं की, ‘आपण ईडीच्या चौकशीला निघालाच की सत्यनारायणाच्या पूजेला’, यावर आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं, व्हॉट्सअपवरही पाठवत आहे. आपणही आपल्या भाषणात अनेकदा काहींना अस्वल म्हणता, तर काहींची टिंगल उडवता, मग नुसतं एवढं म्हटलं तर कुठे बिघडलं? मी लोकशाहीत राहते, मला माझी मतं मांडण्याचा अधिकार आहे, माझ्यावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल आपल्याला काय वाटतं ते कळवावे.. धन्यवाद,” असा मेसेज दमानिया यांनी केला.
राज ठाकरे यांना मेसेज केल्यानंतर दमानिया यांनी त्याचे स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर केले आहेत.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आणि त्यात चौकशीला बोलावल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण होतं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी नजरकैदेतही ठेवलं. राज ठाकरे चौकशीला निघाले तेव्हा त्यांना सोडण्यासाठी त्यांचं कुटुंबही निघालं होतं. याचदरम्यान अंजली दमानिया यांनी ट्वीट केलं.
“राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न”, अशा शब्दात दमानिया यांनी ट्वीट केलं. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दमानिया यांना ट्रोल केलं.