संकट टळलं, यंत्रणा सज्ज होती, आता देवाकडे प्रार्थना, हे वादळ देशाबाहेर जावं : अस्लम शेख
मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी हे वादळाचं संकट मुंबईतून पुढे सरकल्याबद्दल समाधान व्यक्त केलं (Aslam Shaikh on Nisarga cyclone).
मुंबई : प्रचंड वेगवान निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात येऊन धडकलं. यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी यंत्रणांनी बचावकार्य आणि मदतीसाठी जोर लावला. सुरुवातीला मुंबई केंद्र असलेलं हे वादळ नंतर मात्र दिशा बदलून मुंबईच्या बाहेरुन पुढे सरकलं. यावर बोलताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी हे वादळाचं संकट मुंबईतून पुढे सरकल्याबद्दल समाधान व्यक्त केलं (Aslam Shaikh on Nisarga cyclone). तसेच आता हे वादळ महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर जावं, अशी देवाकडे प्रार्थना केली आहे.
अस्लम शेख म्हणाले, “मुंबईवरील मोठं संकट पुढे सरकलं आहे. ते मुंबईतून सरकून पुण्याकडे गेलं आहे. ते आता महाराष्ट्राच्या इतर भागात पसरत असून नुकसान करत आहे. मात्र, यावेळी सरकारने ज्या पद्धतीने तयारी केली होती त्यामुळे उपयोग झाला. अनेक ठिकाणं आपण रिकामी केली, समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना देखील तेथून हलवलं होतं. पाणी साचणाऱ्या भागात आपण पंप लावले होते. हा मुंबईतील पहिला अनुभव होता त्यामुळे बरीच तयारी करण्यात आली होती.”
“आता देवाकडे एकच प्रार्थना आहे की हे वादळ आता महाराष्ट्रातून आणि देशातून बाहेर जावे. आज सकाळपासून जवळपास दोन डझन झाडं मुंबईत पडली आहेत. त्यामुळे जर हे वादळ मुंबईत धडकलं असतं तर काय स्थिती झाली असती याचा विचार करण्यासारखा आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाने जसं काम केलं त्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जिथं जिथं झाडं पडली तिथं तिथं ते झाडं बाजूला करुन रस्ते मोकळे करण्यात आले. जिथं थोडंफार पाणी साचलं तिथंही पंपाने पाणी काढण्यात आलं”, असं अस्लम शेख यांनी नमूद केलं.
“केवळ देवदेवतांवर अवलंबून न राहता, मानवी उपाययोजना केल्या”
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “चक्रीवादळ मुंबईवरुन पुढे सरकलं त्यामुळे बरं वाटलं. असं असलं तरी आपल्या यंत्रणा सज्ज होत्या. आम्ही देखील विविध ठिकाणी जाऊन माहिती घेत होतो. पोलीस देखील आपआपल्या परीने काम करत होते. मुंबईकरांची भावना आणि धारणा असते की आमचा सिद्धीविनायक गणपती, आमची मुंबादेवी, महालक्ष्मी बऱ्यापैकी मुंबईचं रक्षण करते. त्याचे अनेकदा आपल्याला अनुभव आले. मात्र, फक्त देवी-देवतांवर अवलंबून न राहता मानवी उपाय म्हणून आपण सज्जता ठेवली होती.”
“वादळ सरकलं असलं तरी जिथं जिथं झाडं पडली आहेत तेथे तेथे यंत्रणा जाऊन काम करत आहेत. आपण लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जे जे करायला हवं होतं ते ते आपण कालपासून केलं आहे, तयारी ठेवली आहे. आम्ही वर्सोवा बिचपासून दहिसरपर्यंत पाहणी केली आहे. काही ठिकाणी झाडं पडली आहेत, मात्र इतर मोठं नुकसान झाल्याच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत”, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे : बाळासाहेब थोरात
Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ घोंघावलं, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही
CYCLONE NISARGA LIVE | चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी
Aslam Shaikh Kishori Pednekar on Nisarga cyclone