‘संभव हो तो जाने से पहले एक बार जरुर मिलना’, भाजप नेत्याचा मेसेज डावलून तनवाणी शिवसेनेत!
भाजप माजी शहराक्ष किशनचंद तनवाणी (Kishanchand Tanwani) आणि माजी महापौर गजानन बरवाल (Gajanan Barwal) यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे.
मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये आऊट गोईंग तर शिवसेनेत इनकमिंग (Aurangabad BJP Leader in Shivsena) सुरु झाल्याचं चित्र आहे. भाजप माजी शहराक्ष किशनचंद तनवाणी (Kishanchand Tanwani) आणि माजी महापौर गजानन बरवाल (Gajanan Barwal) यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. तनवाणी आणि बरवाल यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा (Aurangabad BJP Leader in Shivsena) शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी दोघांना शिवबंधन बांधले. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
तनवाणी आणि बरवाल यांच्या शिवसेना प्रवेशावेळी मराठवाड्यातील शिवसेना आमदार संजय शिरसाठ आणि अंबादास दानवे हे सुद्धा उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे किशनचंद तनावाणी यांच्या शिवसेना प्रवेशापूर्वी भाजपच्या बड्या नेत्याने त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून एकवेळ भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. “संभव हो तो जाने से पहले एक बार जरूर मिलना…” असा मेसेज तनवाणींच्या मोबाईलवर दुपारी अडीच वाजता आला होता.
‘विधानसभेला युतीधर्माविरोधात काम पटलं नाही’
किशनचंद तनवाणी आणि गजानन बरवाल यांनी शिवेसना प्रवेशापूर्वी भाजप सोडण्याचं कारण सांगितलं. “स्थानिक भाजपमधल्या राजकारणाला आणि कार्यपद्धतीला कंटाळलो. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीधर्माच्या विरोधात काम करायला सांगितलं. आम्हाला ते पटलं नव्हतं. लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन अनेक भाजपचे आजी- माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील”, असं या दोघांनी सांगितलं.
दुसरीकडे सेना आमदार संजय शिरसाठ आणि अंबादास दानवे यांनी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला शिवसेनेत प्रवेश दिसेल, असा दावा केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
औरंगाबाद महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना भाजपला हा मोठा धक्का आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी हे आज औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. आज ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा महाविकास आघाडीने निवडणुकांना सामोरी जाण्याच्या तयारीत आहेत. मनसे आणि भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांपुढे तगड्या एमआयएमचंही आव्हान आहे.
औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना – 29 भाजप – 22 एमआयएम – 25 कॉंग्रेस – 10 राष्ट्रवादी – 03 बसप – 05 रिपब्लिकन पक्ष – 01 अपक्ष – 18
Aurangabad BJP Leader in Shivsena
संबंधित बातम्या
औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी शहराध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर