PUBG गेमवर बंदी घाला, 11 वर्षीय मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : देशभरात सध्या ऑनलाईन गेम पब्जीची (PUBG) चर्चा आहे. जिकडे तिकडे हा गेम खेळत असणारी मुलं दिसतात. सध्या कॉलेज तरुणांपासून लहान मुलांपर्यंत सर्वच जण पब्जी गेम खेळताना दिसतात. या गेमला प्रचंड पसंती मिळत असली, तरी हा गेम तितकाच घातकही आहे. त्यामुळे या गेमला विरोध होत आहे. मुंबईच्या वांद्रे येथील एका 11 वर्षीय लहान मुलाने […]
मुंबई : देशभरात सध्या ऑनलाईन गेम पब्जीची (PUBG) चर्चा आहे. जिकडे तिकडे हा गेम खेळत असणारी मुलं दिसतात. सध्या कॉलेज तरुणांपासून लहान मुलांपर्यंत सर्वच जण पब्जी गेम खेळताना दिसतात. या गेमला प्रचंड पसंती मिळत असली, तरी हा गेम तितकाच घातकही आहे. त्यामुळे या गेमला विरोध होत आहे.
मुंबईच्या वांद्रे येथील एका 11 वर्षीय लहान मुलाने थेट मुख्यमंत्र्यांना पब्जी गेमवर बंदी आणावी यासाठी पत्र लिहिलं आहे. पब्जी गेममुळे हिंसेला प्रोत्साहान मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. अहाद निझाम असं या 11 वर्षीय पत्र लिहणाऱ्या मुलाचं नाव आहे. पब्जी गेमवर बंदी घालण्यासाठी अहाद निझामने मुख्यमंत्र्यांसह देशाचे कायदे तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही पत्र पाठवलं आहे.
अहाद निझाम हा वांद्रे येथील शाळेत शिकतो. त्याने वकिलामार्फत पत्र दिले असून, न्यायालयात पीआयएल अर्थात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही या पत्रातून दिली आहे.
आपल्या चार पानांच्या पत्रात अहाद म्हणतो, “प्लेयर्स अननोन बॅटल ग्राऊंड (PUBG) या आॅनलाईन खेळामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असून हत्या, आक्रमकता, व्यसन या गोष्टी समोर येत आहेत. हा खेळ बंद करण्यात आला नाही तर मी कायद्यानुसार प्रक्रिया करणार आहे”.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मुलांशी गप्पा मारताना, पब्जी या गेमचा उल्लेख केला होता. एका पालकाने आपला मुलगा अभ्यास करत नाही, ऑनलाईन गेम खेळत असतो, अशी तक्रार मोदींकडे केली होती. त्यावर मोदींनी हा गेम PUBG आहे का, असा प्रतिप्रश्न केला होता. ऑनलाईन गेम ही एक समस्याही आहे आणि समाधानही आहे. मुलांनी टेक्नोलॉजीपासून दूर जावं असा विचार आपण केला तर ते चांगलं नाही. टेक्नोलॉजी रोबोट नाही, तर माणूसच बनवतो. जेवणाच्या वेळी मुलांशी चर्चा करा आणि त्यांना प्रोत्साहित करा. नवीन अप्स आलेत त्यातून माहिती घेत राहा. यामुळे मुलांची तंत्रज्ञानामध्ये रुची वाढेल, असं उत्तर मोदींनी दिलं होतं.
दरम्यान, 11 वर्षीय मुलाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यामुळे सध्या पब्जी गेमवर बंदीचं सावट आहे. याआधीही अनेक पालकांनी या गेमला विरोध दर्शवला होता.
काय आहे पब्जी गेम?
दोनवर्षांपूर्वी म्हणजेच मार्च 2017 मध्ये पब्जी हा ऑनलाईन गेम लाँच झाला. विशेष म्हणजे हा गेम जपानच्या बॅटल रॉयल या थ्रिलर चित्रपटावर बनवण्यात आला आहे. या गेममध्ये विद्यार्थी आणि सरकार विरुद्ध संघर्ष दाखवला आहे. तसेच यामध्ये खेळाडू शस्त्रांसह एकमेकांसोबत लढतात. जो खेळाडू शेवटपर्यंत या गेममध्ये स्वत:चा जीव वाचवून जिवंत राहतो तो विजयी ठरतो. प्ले स्टोअरवरुन अनेकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.