देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis visit Shivtirth) शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळी अभिवादन केले.
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis visit Shivtirth) शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळी अभिवादन केले. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे राजकीय खटके उडालेले असताना फडणवीस यांनी स्मृतीस्थळाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर (Devendra Fadnavis visit Shivtirth) येऊन त्यांना अभिवादन केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याच्या वेळेवरुनही बरिच चर्चा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि संजय राऊत स्मृतीस्थळावरुन गेल्यानंतर भाजप नेत्यांनी येणं पसंत केलं आहे. सुरुवातीला पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील स्मृतीस्थळावर पोहचले.
उद्धव ठाकरे यांनी ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेचे भाजपसोबतचे संबंध ताणलेले होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी देखील भाजपचे शिवसेनेसोबत संबंध ताणलेले असतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन केल्याचंही बोललं जात आहे.