कोरोना इफेक्ट : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीआधीच गुंडाळणार
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतीआधीच गुंडाळण्यात येणार आहे (Corona effect on Maharashtra Assembly Budget).
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतीआधीच गुंडाळण्यात येणार आहे (Corona effect on Maharashtra Assembly Budget). स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी माहिती दिली. अधिवेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी मुंबईत यावं लागतं. यात अनेक अधिकारी गुंतून जातात. त्याचा प्रशासनावर ताण येतो. त्यामुळे अत्यावश्यक कामकाज करुन अधिवेशन लवकर संपवण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
अजित पवार म्हणाले, “राज्याच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे अधिकारी मुंबईत येतात. त्यामुळे प्रशासनावर याचा ताण येतो आहे. त्या अधिकाऱ्यांना कोरोनावर नियंत्रणासाठी देखील काम करायचं आहे. हे काम व्यवस्थित करता यावं म्हणून अधिवेशन लवकर संपवण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्याआधी सभागृहाची परवानगी घेतली जाईल. तसेच राज्यपालांशीही चर्चा केली जाईल.”
राज्याच्या पुढील वर्षाच्या आर्थिक तरतुदी महत्त्वाच्या आहेत. त्या केल्या नाही तर 31 मार्चनंतर काहीही खर्च करता येणार नाही. त्यामुळे या अधिवेशनात तातडीने या महत्त्वाच्या बाबींना मंजूरी घेण्यात येईल. अधिवेशनातील ही महत्त्वाची कामं पूर्ण करुनच अधिवेशन संपवण्याचा विचार केला जाईल. अधिकारी, मंत्री, पालकमंत्री या सर्वांना आपल्या भागात काम करता यावं यासाठी अधिवेशन लवकर संपणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा निर्णय घेण्यात येत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव बाहेरुन आलेल्या पर्यटकांच्या स्वरुपात झाला आहे. त्यामुळे पर्यटन कंपन्यांना खबरदारीच्या सुचना दिल्याचंही अजित पवारांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात जायला हवेत असं मत व्यक्त केलं. तसेच यासाठी अधिवेशनाचं कामकाम पूर्ण करुन शनिवारी किंवा रविवारी अधिवेशन संपवण्याचा विचार सुरु असल्याचं नमूद केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “अधिवेशनाबाबत प्रश्न विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघात जाण्याची गरज आहे. याशिवय जे प्रशासन इथे आहे तेदेखील आपापल्या जागी जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं होतं. अध्यक्ष, सभापती महोदय, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि आणखी सहकारी मंत्री होते. कामकाज अर्धवट ठेवून अधिवेशन संपवण्याचं नाही. कामकाज पूर्ण करुन शनिवारी अधिवेशन संपवायचं, जेणेकरुन सर्व लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात जातील आणि कर्तव्य पार पाडतील.”
“सध्या शाळांना सुट्टी देण्याचा विचार नाही, आवश्यकता असेल तर निर्णय घेऊ”
उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या शाळांना सुट्टी देण्याचा विचार नाही, आवश्यकता लागली तर तज्ज्ञांशी बोलून शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेऊ. दहावीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे 2 दिवस थांबावं. त्यानंतर आवश्यक असल्यास शाळांना सुट्टी देण्यावर निर्णय घेऊ. आयपीएलच्या सामन्याबाबत अधिकृत काही प्रस्ताव नाही, मात्र गर्दी टाळायला हवी. प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्यास आयोजक तयार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही विचार करु. मास्क लावण्याची गरज नाही. सर्दी-खोकला झाला असेल, तर रुमाल वापरा, हात स्वच्छ ठेवावेत.”
प्रत्येक जिल्ह्यात साडेसहाशे ते सातशे विलगीकरण बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात प्रशिक्षित डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच उपचारासाठी आवश्यक औषधे आणि वस्तूंचीही उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स
Corona effect on Maharashtra Assembly Budget