15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता : चंद्रकांत पाटील
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही पावलं टाकली आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज बैठक घेतली. या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. 2014 मध्ये 15 ऑक्टोबरला मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल”
दरम्यान, लोकसभा निवडणूक यशाच्या पार्श्वभूमीवर आणि दुष्काळ आढावा घेणारी आणि विधानसभा निवडणूक योजना करण्यासाठी आज भाजपची बैठक झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात फिर एक बार शिवशाही सरकार यात्रा काढणार आहोत. येत्या ऑगस्टपासून ही यात्रा काढली जाणार आहे. ‘अबकी बार 220 पार’ ही नवीन घोषणा आहे, असं पाटील म्हणाले.
शिवसेना असो भाजप सर्व जागा विजयी करायच्या आहेत. कोणत्याही पक्षाची भूमिका असते आपला मुख्यमंत्री व्हावा. गिरीश महाजन यांच वक्तव्य अत्यंत साधं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा दोघांनी मिळून लढवावी, असं दादांनी सांगितलं.
मुख्यमंत्री कोण होईल हे अमित शहा आणि उद्धवजी ठरवतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गिरीश महाजन काय म्हणाले?
लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे सर्वांच्या भावना आहेत की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न के. जिथे शिवसेना कमजोर होती त्या ठिकणी आम्ही मदत केली. निकाल जर पाहिला तर निश्चितच आम्ही मोठे भाऊ आहोत. तरीसुद्धा मुख्यमंत्रिपदाचा निर्णय अमित शाह, जे पी नड्डा आणि उद्धवजी घेतील, असं गिरीश महाजन म्हणाले.