आमदार रईस शेख यांच्याकडून सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली, शिधा वाटपादरम्यान महिलांची गर्दी
भिवंडी पूर्व चे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी गरीब गरजू कुटुंबियांसाठी धान्य वितरण कार्यक्रम आयोजित केला होता
भिवंडी : भिवंडी शहरातील भिवंडी पूर्व चे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांनी गरीब गरजू कुटुंबियांसाठी धान्य वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी हजारो महिला दाटीवाटीने (Social Distancing) उभ्या असून तिथे अक्षरश: सामाजिक अंतराचा फज्जा (MLA Rais Shaikh) उडविण्यात आला. तसेच, संचारबंदीच्या काळात जमाव जमवून कायद्याचे सुध्दा उल्लंघन केल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळायचा असल्यास प्रत्येकाने एकमेकांपासून ठराविक अंतर राखणे गरजेचे आहे आणि तोच या विषाणूला रोखण्यासाठीचा जालीम उपाय आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांकरिता सर्व व्यवहार, व्यवसाय बंद ठेवून लॉकडाऊन जाहीर केले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पहिल्या दिवसापासून नागरिकांनी एकमेकांपासून अंतर राखा, त्यासाठी घरात बसा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. मात्र, इतकं सांगूनही भिवंडीत धान्य वाटपाच्या नावाखाली मोठी गर्दी जमली.
सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आरोग्य आणि पोलीस विभाग दिवस रात्र अपार कष्ट करुन या विषाणूला थोपविण्यासाठी जीवापाड मेहनत करीत आहेत. त्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंन्सिंग राखण्याचं आवाहन करत आहेत. यासाठी पोलीस आणि स्थानिक महानगरपालिका कर्मचारी किराणा दुकानदार, भाजीपाला आणि दूध विक्रेते या ठिकाणी दुकानांसमोर रिंगण आखून देत आहेत. तर शहरात असलेले परराज्यातील लाखो स्थलांतरीत कामगार आज ही धान्य मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांना अनेक सेवाभावी संस्था, विविध राजकीय पक्ष पदाधिकारी शिजविलेली अन्न पाकिटे, तर कोठे धान्य पाकिटे घरोघरी जाऊन वितरीत करीत आहे (MLA Rais Shaikh).
Together we can! #CoronaHarega pic.twitter.com/f1cXgSb1oC
— Rais Shaikh (@rais_shk) April 4, 2020
मात्र, भिवंडीत काही वेगळचं चित्र दिसून आलं. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी भिवंडी शहरातील अवचित पाडा रोड वरील खंडू पाडा या ठिकाणी गरीब गरजू महिलांना धान्य वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची वार्ता अनेक झोपडपट्टी विभागात पसरल्यावर कार्यक्रमस्थळी हजारो महिला धान्य घेण्यासाठी एकत्रित झाल्या. ज्यामुळे येथील सामाजिक अंतर राखण्याच्या संकल्पनेलाच हरताळ फासला गेला. एवढेच नव्हे, तर सध्या सुरु असलेल्या संचारबंदी काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे कायद्याद्वारे नागरिकांना बजावले जात असताना या कार्यक्रमात अनेक महिलांना एकत्रित करुन या कायद्याचे सुध्दा उल्लंघन केल्याचे झाले आहे. .
भिवंडी शहरात स्थलांतरीत कामगारांचा भरणा अधिक असून शिधावाटप पत्रिका नसणाऱ्यां नागरिकांसाठी सरकारने काही केले पाहिजे, असे सांगत गरीब कुटुंबियांची होणारी परवड पाहून भिवंडी शहरात धान्य वितरण करावे लागत असल्याचे आमदार रईस शेख यांनी सांगितले. भिवंडी शहरातील विविध भागात पक्ष कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी जाऊन धान्य वितरण करत असली, तरी येथील नागरिकांकडून मागणी वाढल्याने हे धान्य वाटप होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही रिस्क घेऊन काम करीत असताना, लॉकडाऊन या आजारास कंट्रोल करत असल्याने नागरिकांनी घरात राहावे असे, साळसूद पणाचे आवाहन आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांनी केले.