जिंकणाऱ्या जागांचा अंदाज कळतो, पावसाचा का नाही? निवडणुका पुढे ढकला : राज ठाकरे
कोल्हापूर-सांगलीतील महापुराबाबत सरकारी अनास्थेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीकास्त्र सोडलं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली.
मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील महापुराबाबत सरकारी अनास्थेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीकास्त्र सोडलं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. विधानसभा निवडणूक पुढील वर्षी घ्या असं राज म्हणाले.
“कोल्हापूर, सांगली, कोकण यासह राज्याच्या अनेक भागात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता, तिथे मदत आणि पुनर्वसन कामात सरकारी अधिकारी व्यस्त असतील. हे काम लवकर पूर्ण होईल असं दिसतं नाही. त्याला वेळ लागेल. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर त्याचा ताण पडेल. त्यामुळे ही एकूण परिस्थिती लक्षात घेत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी”, असं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे. परिस्थिती गंभीर आहे. सरकारमध्ये निर्लज्ज लोक आहेत. एखाद्या राज्यात अशी परिस्थिती झाल्यानंतर त्याची तयारी नको का? त्यांचे आकडे ठरलेले आहेत. त्यांना याच्याशी काही घेणे-देणे नाही. जर त्यांना किती सीट निवडून येतात याचे अंदाज कळतात तर एवढी मोठी घटना होणार आहे याचा अंदाज कळत नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
अशा अवस्थेत मतदान घेणार का, असा सवाल करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्यासाठी पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं.
पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. सर्व पूर्वपदावर येण्यासाठी किमान 6 महिने तरी लागतील. मुंबईत पूल कोसळल्यानंतर तो बांधायला आर्मीला दिला त्यावेळी कान्ट्रॅक्टर नव्हते का? मग तुम्ही या ठिकाणची परस्थिती आर्मीच्या हातात का दिली नाही? आर्मी लवकर करेल म्हणूनच दिलं ना? बॅक वॉटरमध्ये तुम्ही फिरायला गेले होता का? अशी प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली.