राज ठाकरेंची पवारांशी चर्चा, मनसे लोकसभा लढणार नाही- सूत्र
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना, आता नवी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची याबाबत चर्चा झाली. यावेळी लोकसभा लढण्यास मनसे इच्छुक नसल्याचं […]
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना, आता नवी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची याबाबत चर्चा झाली. यावेळी लोकसभा लढण्यास मनसे इच्छुक नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला रस असल्याचंही यादरम्यान नमूद करण्यात आलं. सत्ताधारी पक्षाविरोधात लढणार असल्याचं मनसेनं जाहीर केलं आहे.
सध्या शिवसेना आणि भाजप हे सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात म्हणजे शिवसेना-भाजपविरोधात लढण्यासाठी मनसेने दंड थोपटल्याचं यावरुन पाहायला मिळत आहे.
मनसेला मुंबईत एक जागा देण्याची यापूर्वीची चर्चा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करुन येत्या लोकसभा निवडणुकींना सामोरं जाणार आहेत, हे एव्हाना निश्चित झाले आहे. या आघाडीत आता इतर मित्रपक्ष जोडण्यासही सुरुवात झाल्याचे दिसते आहे. त्यातूनच राज ठाकरे यांच्या मनसेचा पर्याय पुढे येत आहे.
मनसेला आघाडीच्या कोट्यातून मुंबईत लोकसभेसाठी एक जागा देण्याची चर्चा सुरु झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला द्यावी आणि इतर ठिकाणी त्यांची मदत घ्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला होता.
दुसरीकडे कल्याणची एक जागा मनसेला सोडण्याचा विचारही राष्ट्रवादीमध्ये चर्चेत असल्याचं सांगण्यात येत होतं. मनसेला सोबत घेण्यासाठी अजित पवार यांनी जाहीर भूमिका घेतली होती. शिवाय छगन भुजबळ, नवाब मलिकांसह दिग्गजांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत भाष्य केलं होतं.
नवी राजकीय समीकरणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आघाडीत जाण्यासंदर्भात अद्याप काहीच भूमिका मांडली नाही. किंबहुना, लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेची रणनीती काय असेल, याबाबताही राज ठाकरे अद्याप जाहीर बोलले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचं या सर्व गोष्टींवरील एकंदरीत मौन आणि त्यात राष्ट्रवादीकडून मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात होणारे प्रयत्न, यातून येत्या काळात नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध का?
उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.