गडकिल्ले लग्न, समारंभासाठी भाड्याने नाहीत, पर्यटन विभागाचं स्पष्टीकरण, मंत्रिमंडळाचा नेमका निर्णय काय?
पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन (Forts of Maharashtra) झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
मुंबई : पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन (Forts of Maharashtra) झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं.
पर्यटन विभागाचं स्पष्टीकरण जसेच्या तसे
“राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.
वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.
मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये”.
विनीता सिंगल, सचिव, पर्यटन
नेमकं प्रकरण काय आहे?
महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं (Forts of Maharashtra) हेरिटेज हॉटेल (Heritage Hotel) किंवा विवाह स्थळांमध्ये (Wedding Destination) रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला (Heritage Tourism) चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी (Maharashtra Tourism Development Corporation – MTDC) ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं जतन होण्याऐवजी त्यांचं हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे. राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनीही ट्विटरवरुन चिड व्यक्त केली आहे.
स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या पर्यटनाची टूम आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्सना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मंत्रिमंडळाचा नेमका निर्णय काय?
पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी वर्ग 2 किल्ले सुद्धा भाडेतत्त्वावर देण्यात येतील. यातून मिळणाऱ्या अधिमूल्याच्या रकमेचा वापर नवीन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या