अंधेरीत एकाच कुटुंबातील 10 जणांना ‘कोरोना’, मुंबईतील दोन खासगी रुग्णालयात उपचार
पाच जण मरोळच्या सेवन हिल्स हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत, तर पाच जण विलेपार्ल्यातील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत (Mumbai Andheri Family Corona Positive)
मुंबई : मुंबईतील अंधेरीत एकाच कुटुंबातील 10 जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसात या 10 जणांचे ‘कोरोना’चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच कुटुंबातील अनेकांना होणारा संसर्ग मुंबईकरांची धाकधूक वाढवणारा आहे. (Mumbai Andheri Family Corona Positive)
दहा जणांचं कुटुंब दोन रुग्णालयात विभागून दाखल झालं आहे. पाच जण मरोळच्या सेवन हिल्स हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत, तर पाच जण विलेपार्ल्यातील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. एकाच रुग्णालयात जागा न मिळाल्याने कुटुंबाला दोन हॉस्पिटल्स गाठावी लागली.
दहा जणांच्या कुटुंबात 21 वर्षांच्या तरुणीसह तिघा वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. या कुटुंबाने सुरतमध्ये एका लग्नाला हजेरी लावली होती, तिथून संसर्ग झाल्याची शक्यता कुटुंबातील एका सदस्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया’कडे बोलून दाखवली आहे.
याआधी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. चिमुकल्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकाच कुटुंबातील 20 पेक्षा अधिक नातेवाईकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं टप्प्याटप्प्याने समोर आलं होतं.
मुंबई शहरात रविवारी 103 नवीन ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. 2 एप्रिलपर्यंत शहरामध्ये 238 रुग्ण होते, तेव्हा रुग्णालयातील 310 खासगी बेडपैकी सुमारे 42% जागा भरल्या होत्या.
राज्यात कालच्या दिवसात (5 एप्रिल) 113 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे तर आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 458 वर पोहोचला आहे.
जगात एका दिवसात ‘कोरोना’चे 71 हजार 254 नवे रुग्ण, मुंबई-ठाणे-पुणे ते अमेरिका-इटली-स्पेन, ‘कोरोना’ची ताजी स्थिती एकाच ठिकाणी https://t.co/cs2B1A9VWJ #coronaupdatesindia #CoronaInMaharashtra #coronaworld
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2020
राज्यात काल 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 45 कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. एकट्या मुंबईत 30 कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडले आहेत. (Mumbai Andheri Family Corona Positive)