नियुक्तीनंतर तासाभरात पदभार, BMC आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, धारावीची रणनीती ठरवणार
मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल (BCM Commissioner Iqbal singh Chahal) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal singh Chahal) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. इक्बाल चहल यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी पदभार स्वीकारला. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची मुंबई मनपा आयुक्तपदी बदली झाल्याचं वृत्त आलं आणि लगेचच म्हणजे रात्री 8 च्या सुमारास इक्बाल चहल यांनी पदभारही स्वीकारला. मुंबई मनपाचे मावळते आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करुन, त्यांच्या जागी चहल यांना आणण्यात आलं आहे. (BMC Commissioner Iqbal singh Chahal)
मुंबई महापालिकेचे नवे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल हे आज सकाली पाहणीसाठी नायर रुग्णालयात पोहोचले. नायर रुग्णालयात केवळ कोवीड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलाच पाहणी दौरा आहे.
दरम्यान, पदभार स्वीकारताच आयुक्त इक्बाल चहल हे मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी रणनीती आखत आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम पाहिल्याने इक्बाल यांना धारावीचा अनुभव आहे. धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता इक्बाल चहल यांनी पहिल्यांदा धारावीकडेच लक्ष दिलं आहे. नवे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दुपारी तीन वाजता महापालिका मुख्यालयात धारावी आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.
वाचा : धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?
जी उत्तर विभागाचे वॉर्ड ऑफिसर आणि इतर अधिकारी यांना धारावीचा रिपोर्ट घेऊन महापालिका मुख्यालयात दुपारी 3 वाजता बैठकीस बोलावले आहे. स्वत: आयुक्त इक्बाल चहल हे सुद्धा धारावीला भेट देण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत अद्याप वेळ निश्चित नाही.
लगेचच पदभार स्वीकारला
महानगरपालिकेचे मावळते आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्य सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार इक्बाल चहल यांनी काल (दिनांक 8 मे 2020) सायंकाळी महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.
20 जानेवारी 1966 रोजी जन्मलेले इक्बाल चहल यांनी 12 वी परीक्षेत विज्ञान शाखेत 96 टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादित केल्यानंतर इक्बाल चहल यांनी 1989 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्ये महाराष्ट्र तुकडीत प्रवेश केला.
भारतीय प्रशासकीय सेवेचा 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या इक्बाल चहल यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्ये सोपवली होती.
गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्ये भरीव योगदान दिलेल्या श्री. चहल यांनी जलसंपदा खात्यामध्ये केलेल्या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट जलसिंचन व्यवस्थापनाचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या नेतृत्वात ‘सेतू’ केंद्राच्या यशस्वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स पुरस्कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार देखील मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारे धावपटू म्हणूनदेखील त्यांची वेगळी ओळख आहे.
संबंधित बातम्या
BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं
धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?