वात पेटली आहे, भडका होऊ शकतो, डबेवाले राज ठाकरेंना भेटले
डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली. (Mumbai Dabbawala Meet Raj Thackeray)
मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीला सामोरे जावं लागलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आज (24 सप्टेंबर) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली. तसेच डबेवाल्यांच्या व्यथाही राज यांच्यासमोर मांडल्या. (Mumbai Dabbawala Meet Raj Thackeray)
राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे.
मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केलं. त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
मनसेच्या आंदोलनाला डबेवाल्यांचा पाठिंबा
मनसेच्या लोकल प्रवास सविनय कायदेभंगाला मुंबई डबेवाला असोशिएशनकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मनसेप्रमाणे आम्हाला लोकलने प्रवास करुन सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मुंबई डबेवाला असोशिएशनने दिला होता. (Mumbai Dabbawala Meet Raj Thackeray)
राज्यात कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी डबेवाल्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबईकरांसाठी मनसेचा रेल्वे प्रवास
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली होती. मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनी रेल्वे प्रवास केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करत अटक केली होती.
मनसेच्या सविनय आंदोलन करण्यापूर्वी अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. जर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक माणसं दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कलम 149 आणि 144 प्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही यात म्हटलं होतं.(Mumbai Dabbawala Meet Raj Thackeray)
संबंधित बातम्या :
MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास
मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?