उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली यासह अनेक खळबळजनक खुलासे त्यांच्या आत्मचरित्रातून केले आहेत. शिवाय 1995 ला राज्यात युतीचं सरकार असताना मनोहर जोशी हे सक्षम मुख्यमंत्री नव्हते, असंही या पुस्तकात म्हटलंय. शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनधरणी केली, पण विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव […]
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली यासह अनेक खळबळजनक खुलासे त्यांच्या आत्मचरित्रातून केले आहेत. शिवाय 1995 ला राज्यात युतीचं सरकार असताना मनोहर जोशी हे सक्षम मुख्यमंत्री नव्हते, असंही या पुस्तकात म्हटलंय. शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनधरणी केली, पण विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरेंसह घर सोडण्याची धमकी दिली होती, असा खुलासा राणेंनी केलाय.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2002 साली आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचंही राणेंनी म्हटलंय. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना अधिकारी घाबरत नव्हते, असा दावा त्यांनी केलाय. “No Holds Barred: My Years In Politics” हे आत्मचरित्र राणेंनी लिहिलंय.
उद्धव ठाकरेंबाबात राणे काय म्हणाले?
No Longer A Shiv Sainik या प्रकरणात राणेंनी शिवसेना सोडल्याबाबतचा खुलासा केलाय. “माझ्या कर्मचाऱ्यांना सकाळी तीन राजीनामे तयार करण्यासाठी सांगितले. साहेबांची वेळ घेतली, सायंकाळी त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि राजीनामा दिला. एक शिवसेनेचा, दुसरा विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि तिसरा आमदारकीचा राजीनामा होता. त्यांनी तातडीने उद्धवजींना बोलावण्याचे आदेश दिले. साहेबांनी उद्धव यांना समजावून सांगितलं की वरिष्ठ नेत्यांशी अशी वागणूक करण्याचा तुमच्याकडे कोणताही अधिकार नाही. पण उद्धव यांनी सर्व आरोप फेटाळत वडिलांना त्यांची बाजू सांगितली. पण मी राजीनामा मागे घेणार नाही हे निश्चित केलं होतं.
साहेबांनी मला घरी पाठवलं आणि आराम करायला सांगितला. ती अखेरची वेळ होती, जेव्हा मी साहेबांमधला माणूस पाहिला. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला प्रेमाने बोलावलं आणि विचारलं, ‘काय नारायण, तुझा राग कमी झालाय का आता?’ पण मी माघार न घेण्याच्या मतावर ठाम होतो. माझ्या प्रामाणिक शिवसैनिकांकडून मला माहित पडलं की, साहेबांनी मला मनधरणीसाठी परत बोलावलंय हे पाहून उद्धव यांना संताप अनावर झाला. ते मला पाहण्यासाठी खाली आले आणि त्यानंतर मी निघण्याचा निर्णय घेतला.
‘एकतर ते राहतील किंवा मी राहतो’, अशी धमकी त्यांनी (उद्धव ठाकरे) दिली. त्यांनी अल्टीमेटम दिला होता, ‘जर राणे पक्षात परत येतील तर मी आणि रश्मी मातोश्री सोडणार’, असा अल्टीमेटम दिल्याचा उल्लेख राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रात केलाय. यासह अनेक खळबळजनक खुलासेही त्यांनी केले आहेत.