विधानसभा अध्यक्ष दुचाकीवर, भास्कर जाधवांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी धावाधाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (13 सप्टेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (13 सप्टेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ते शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाधव यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षप्रवेश देतील. आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी ते सकाळी चार्टड विमानानं औरंगाबादला (Aurangabad) रवाना झाले होते. तेथे त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला.
आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला जाताना भास्कर जाधव यांच्यासोबत यावेळी शिवसेनेचे नेते रामदार कदम, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत हेही उपस्थित आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि विधान परिषद शिवसेना गटनेते अॅड. अनिल परब हेही औरंगाबादमध्ये उपस्थित राहणार आहेत.
भास्कर जाधवांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दुचाकीवर
#औरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बाईकवरुन पोहोचले @_BhaskarJadhav pic.twitter.com/YR0KY9hvJB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2019
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे थेट दुचाकीवरून आल्याचं पाहायला मिळालं. कारने यायला उशीर होऊ शकतो म्हणून वेळ वाचवण्यासाठी त्यांनी थेट दुचाकींचा आधार घेतल्याचं सांगितलं जात आहे. हरिभाऊ बागडे आणि भास्कर जाधव यांची भेट कुंभेफळ येथे ठरली होती. हरिभाऊ बागडे येऊपर्यंत भास्कर जाधव शिवसेना नेत्यांसोबत एका खासगी कार्यालयात थांबले होते. त्यामुळे हरिभाऊ बागडे यांनी दुचाकीचा आधार घेत कुंभेफळ गाठले.
विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी
विधानसभेपूर्वी (Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अनेक आमदारांनी सोडचिठ्ठी दिल्याने पक्ष खिळखिळा झाला आहे. रायगडचे राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते प्रमोद घोसाळकर, आमदार दिलीप सोपल यांसह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाणार आहेत.
भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघात एक बैठकही घेतली होती. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत गुहागर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावप्रमुख वाडी प्रमुख आणि सरपंच हेदेखील प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे गुहागरच्या राष्ट्रवादीची सर्व कार्यकारणीदेखील त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करेल असंही त्यांनी सांगितलं होतं.
कोण आहेत भास्कर जाधव?
1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. 1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवली. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.
2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.
आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आलं.