मुंबई महापालिकेची रुग्णालये दुर्लक्षित, डायबिटीजचे दररोज 26 बळी, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
प्रजा फाऊंडेशन (Praja Foundation) या सेवाभावी संस्थेने मुंबईतील आरोग्य यंत्रणेचं भीषण वास्तव समोर आणलं आहे.
मुंबई : प्रजा फाऊंडेशन (Praja Foundation) या सेवाभावी संस्थेने मुंबईतील आरोग्य यंत्रणेचं भीषण वास्तव समोर आणलं आहे. अर्थसंकल्पात भरीव तरतूद असतानाही मुंबई महापालिकेचे रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याची टीपणी प्रजा फाऊंडेशनने (Praja Foundation) केली आहे.
महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. 2018 मध्ये पालिका दवाखान्यांकरिता संमत करण्यात आलेल्या पदांच्या तुलनेत 19% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. 2018 मध्ये ओपीडीत सरकारी बाह्यरुग्णांपैकी 76% रुग्ण सरकारी, तर 24% रुग्ण खासगी दवाखान्यात जातात.
मुंबईत 2018 मध्ये एल विभागात सर्वाधिक संवेदनशील आजारांची नोंद करण्यात आली. 11,505 अतिसार,768 क्षयरोग,1831 मधुमेह रुग्णांची नोंद झाली आहे.
मधुमेहाचे सर्वाधिक बळी
मुंबईत मधुमेहाने सर्वाधिक मृत्यू होत असल्याचं भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशनने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. मधुमेहमुळे मुंबईत दररोज 26 जणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. शिवाय संसर्गजन्य आजारात सर्वाधिक क्षयरोगामुळे (टीबी) दररोज 15 जणांचा मृत्यू होत असल्याचं उघड झालं आहे.