भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा कोरेगाव प्रकरणात साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे.
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणात साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे (Testimony of Sharad Pawar in Bhima Koregaon case). शरद पवारांनी अनेकदा माध्यमांसमोर भीमा कारेगाव प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयालाही माहिती दिली आहे.
आयोगाचं चौकशीचं वेळापत्रक ठरलेलं नसलं, तरी शरद पवार यांना लवकरच साक्षीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. कारण चौकशी आयोगाला अल्पमुदतवाढ मिळाली आहे. केवळ तीन महिन्यांच्या मुदतवाढीपैकी आयोगाचा एक महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचं कामकाज होऊ शकतं.
शरद पवार यांची साक्ष पुण्यात होणार असल्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मार्चमध्ये ही सुनावणी होईल. मोठा काळ ही सुनावणी चालेल. याच दरम्यान शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी आगामी काही दिवसांमध्येच आयोगाकडून शरद पवार यांना साक्षीबाबत समन्स पाठवण्यात येईल. शरद पवार यांनी यापूर्वी चौकशी आयोगासमोर स्वतः एक प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. त्यानंतर त्यांना साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, शरद पवार यांनी सातत्याने भीमा कोरेगाव प्रकरणावर भूमिका घेत पुणे पोलिसांच्या तपासावर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाही या प्रकरणात साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी होत होती. स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील हीच मागणी केली होती.
Testimony of Sharad Pawar in Bhima Koregaon case