वृक्षलागवड थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा, सुधीर मुनगंटीवारांचे सयाजी शिंदेंना उत्तर
वृक्ष लागवडी हे फक्त वन विभाग करत नाही. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यात वन आंदोलन सुरु झाले आहे. हे सर्व थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी याचा अभ्यास करावा आणि नंतर अशाप्रकारचे वक्तव्य केले पाहिजे
मुंबई : “महाराष्ट्रात वृक्ष लागवड ही फक्त वन विभागाद्वारे केली जात नाही. तर वन विभागाच्या पुढाकाराने आनंदवन, धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंताजलीच्या माध्यमातून लाखो वृक्ष लावले जात आहे. यात पर्यावरणप्रेमी, एनजीओचाही सहभाग आहे. हे सर्व थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी याचा अभ्यास करावा आणि नंतर अशाप्रकारचे वक्तव्य केले पाहिजे”, असे प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलणारे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्रात होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ एक नाटक आहे. राज्यात होणाऱ्या 5 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हे निव्वळ एक थोतांड आहे. वृक्ष लागवडीच्या मोहीमेतून भ्रष्टाचाराला थतपाणी घातलं जात असून त्याच त्याच खड्ड्यात वृक्षांची लागवड केली जाते, अशी टीका त्यांनी सरकारवर केली होती.
या टीकेवर प्रत्युत्तर देताना सुधीर मुनंगटीवार म्हणाले, “वृक्ष लागवडी हे फक्त वन विभाग करत नाही. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यात वन आंदोलन सुरु झाले आहे. यानुसार ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन या सामाजिक संस्थेत ही वृक्ष लागवड केली जाते हे नाटकं कसं असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यामातूनही लाखो वृक्ष लावले जातात. इतकंच नव्हे तर पर्यावरण प्रेमी, विविध सामाजिक संस्थाही पुढे येऊन वृक्ष लागवड करतात. म्हणजे हे काम फक्त 27 हजार वन कर्मचारी करत नाहीत.”
जवळपास 40 ते 45 लाख लोक, राज्यातील सर्व विभाग म्हणजेच ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, परिवहन विभाग, शिक्षण विभाग हे नाटक करतात असे भाष्य करताना अभ्यासपूर्ण भाष्य केलं पाहिजे. एखादी ग्रामपंचायत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात चूक करत असेल तर ती चूक लक्षात आणून द्यावी. पण जर या राज्यातील वृक्षप्रेमी वृक्ष लावण्याचे नाटक करतात असे म्हणणं हेच एक मुळात नाटकं आहे असेही मुनगंटीवार म्हणाले.
“काही लोक स्वत:च्या पदरचे पैसे टाकून वृक्ष लावतात. आर्मीचे इको बटालियन, औरंगबादेतील मिलिट्रीचे जवान या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी झाले आहे. मग त्यांच्यावरही तुम्ही शंका उपस्थित करतात. म्हणजे आपण एकटे प्रामाणिक बाकी अर्धा कोटी महाराष्ट्राची जनता अप्रामाणिक हे आश्चर्यजनक आहे”, असेही मुनगंटीवार म्हणाले.
“सयाजी शिंदेकडे याबाबत काही जास्त माहिती असेल, तर त्यांच्याकडून ती घ्यावी असे मी वन विभागाला सांगितले आहे. जर यात काही चूक आढळली तर त्यासाठी चौकशी समितीची स्थापना करु असेही त्यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.”
वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. अनेक लोक पुढे येत आहेत. सध्या 50 टक्केपेक्षा कमी वृक्ष हे वन विभागाचे आहे. तर इतर 33 कोटीमधील वृक्ष हे स्वयंसेवी संस्था व इतर माध्यामातून लावले जात आहे. मात्र जर सयाजी शिंदे अशाप्रकारे यावर शंका घेणार असतील तर ती एक ऐतिहासिक घोडचूक ठरेल असा टोलाही त्यांनी सयाजी शिंदेंना लगावला.
सुधीर मुनंगटीवार यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना सयाजी शिंदे म्हणाले की, “मला प्रत्यक्षात काही अनुभव आलेत म्हणून मी असे भाष्य केले. सरकार लागवड करत असलेली रोप चांगली नाहीत. आपल्याकडे जास्त प्रजाती असणे गरजेच आहे. मात्र ती उपलब्ध नाहीत. सरकारने स्वत: झाडं लावावी आणि जगवावी असे सांगितले आहे. मात्र हे खरचं शक्य आहे का? म्हणूनच मला वाटतं हे सरळ खोटं आहे”, असे त्यांनी यावेळी सांगितले.
“गेल्या 70 वर्षांपासून वृक्ष रोपणाचा प्रश्न आहे. त्यामुळे जी काही वृक्षांची लागवड झाली असेल ती नेमकी कुठे झाली, कधी झाली याची माहिती मिळणे गरजेचे आहे. दरम्यान जर वृक्ष लागवडीत काही भ्रष्टाचार होत असेल, तर त्यासाठी समितीची नेमणूक केली जाईल,” असे स्पष्टीकरणही मुनगंटीवार यांनी सयाजी शिंदेंना दिले.