शिवसेनेची भविष्यातील वाटचाल भव्यदिव्यच असेल; राऊतांनी मांडली ‘महा’ क्रोनोलॉजी
यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात 'महा'राष्ट्र, 'महा'विकासआघाडी अशा महा (मोठ्या) गोष्टीच घडतील| Sanjay Raut
मुंबई: शिवसेनेची भविष्यातील वाटचाल ही भव्यदिव्य असेल. गेल्यावर्षी याच दिवसात युद्धाला प्रारंभ झाला. आपण महाराष्ट्रात असत्यावर विजय मिळवून आजचा महाविजयादशमी मेळावा साजरा करत आहोत. त्यामुळे आता यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात ‘महा’राष्ट्र, ‘महा’विकासआघाडी अशा महा (मोठ्या) गोष्टीच घडतील, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ( Sanjay Raut in shivsena Dussehra rally)
भविष्यात शिवसेनेने दिल्लीचे तख्त राखण्याच्या दिशेने वाटचाल केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कोणी कितीही चिखलफेक केली तरी ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. किंबहुना त्यानंतरची 25 वर्ष आपलेच सरकार असेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते रविवारी मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे सरकार पडणार, अशी आवई उठवणाऱ्या भाजप नेत्यांना टोले लगावले. मी दरवेळी दिल्लीत जातो तेव्हा महाराष्ट्रातील सरकार पडणार, अशी चर्चा असते. महाराष्ट्र सरकार पाठवण्यासाठी 200 कोटी रुपये पाठवण्यात आलेत, असे सांगितले जाते. परंतु, 200 कोटी रुपये सांगून महाराष्ट्राची इज्जत काय घालवताय? एवढ्या रक्कमेचे व्यवहार तर महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या राजकारणात होतात. त्यामुळे महाराष्ट्राची पत ओळखून किमान 2000 कोटींचे वैगेरे आकडे सांगावेत, अशा शब्दांता संजय राऊत यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान
काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना दिलं.
राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली.
संबंधित बातम्या:
CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान
( Sanjay Raut in shivsena Dussehra rally)