Diwali 2023 | या गावात एक आठवड्याआधी साजरी होते दिवाळी, कारण ऐकाल तर हैराण व्हाल
दिवाळीच्या सणासाठी घरात दारात रांगोळी काढली जाते. कंदील आणि दिवे लावले जातात. घरांमध्ये फराळ आणि मिठाई आणली जाते. लहान मुलांना दिवाळी म्हणजे फटाके फोडणे, फराळ-मिठाई खाण्याची पर्वणी असते. परंतू आपल्या देशातील एका गावात दिवाळी सण एका आठवड्या आधीच साजरा केला जातो.
मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा सण देशभरातच काय जेथे – जेथे जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय रहात आहेत. तेथे मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. दिवाळी सारख्या हिंदूंच्या सणाचा इतका मोठा प्रभाव असतो की भारतातील सर्व धर्माचे लोक दिवाळी आपल्या परीने साजरी करत असतात. परंतू देशातील एक अशी जागा आहे जेथे दिवाळीचा उत्सव दिवाळीच्या एक आठवडा आधीच साजरा केला जातो. या गावात केवळ दिवाळीच नाही तर प्रत्येक मोठा सण हा त्या सणाच्या तारखेला साजरा केला जात नाही. त्यामुळे अख्खा देश ज्यावेळी सण साजरा करीत असते तेव्हा येथे शांतता असते. काय आहे नेमके यामागे कारण आणि कोणते ते नेमके गावा चला पाहूया….
दिवाळीच्या सणासाठी घरात दारात रांगोळी काढली जाते. कंदील आणि दिवे लावले जातात. घरांमध्ये फराळ आणि मिठाई आणली जाते. लहान मुलांना दिवाळी म्हणजे फटाके फोडणे, फराळ-मिठाई खाण्याची पर्वणी असते. परंतू छत्तीसगढच्या धमतरी जिल्ह्यातील सेमरा गांवात कोणताही सण तेव्हा साजरा केला जात नाही जेव्हा तो इतर भागात साजरा केला जात असतो. येथे एक आठवड्याआधीच सर्व सण साजरे होत असतात. वास्तविक या गावात जर कोणी सणाच्या दिवशी सण साजरा केला तर त्यांना शाप लागतो आणि दु:खाचा डोंगर कोसळतो अशी मान्यता आहे. त्यामुळे सेमरा गावात एक आठवडा आधीच दिवाळी साजरी होते. ही परंपरा तोडण्याचे धाडस कोणी करीत नाही. जण चुकून जरी कोणी दिवाळीच्या दिवशी सण साजरा केला तर त्याला हा शाप लागतो अशी भीती गावकऱ्यांमध्ये आहे.
प्रत्येक सण एक आठवड्याआधी साजरा
सेमरा गावात दिवाळी तसेच होळी, हरेली आणि पोळा सारखे प्रमुख सण एक आठवडा आधीच साजरे केले जातात. दिवाळीच्या एक आठवड्याआधीच मातीच्या पणत्या पेटविल्या जातात. मोठ्या उत्सवात लक्ष्मी पूजन केले जाते. रांगोळ्या काढल्या जातात. अबालवृद्ध फटाके फोडतात.
अशी आहे प्रथा परंपरा
या आगळ्या वेगळ्या परंपरेबाबत कोणी जास्त बोलायला तयार होत नाहीत. या गावातील लोक म्हणतात की त्यांच्या गावात सिदार देवाची पूजा केली जाते. हा देव संपूर्ण गावाचे संरक्षण करतो अशी धारणा आहे. एकदा या देवतेने संपूर्ण गावाला वाचविले होते. या गावातील एका पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन देवाने आदेश दिला होता की जर गावकऱ्यांनी सर्वात आधी त्यांची पूजा केली तर ते गावावर कोणतेही संकट येऊ देणार नाहीत. या आदेशानंतर गावकऱ्यांनी प्रत्येक सण एक आठवड्याआधीच साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सिदार देवाची पूजा केली जाते. जर असे केले नाहीत सिदार देव नाराज होऊ शकतात आणि गावावर संकट येऊ शकते असे म्हटले जात आहे.