हाय रे कर्मा, मुलीच्या लग्नासाठी बॅंकेत ठेवलेले 18 लाख वाळवीने खाल्ले, कुठे घडला प्रकार पाहा
या महिलेला लॉकर एग्रीमेंट रिन्युअल आणि केवायसीसाठी बॅंकेने बोलावले त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे बॅंकेच्या लॉकरमध्ये पैसे ठेवणे सुरक्षित नसल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेश | 27 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील मुराबाद जनपद येथील बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथील एका महिला खातेदाराच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि 18 लाखाची रोकड वाळवीने फस्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम बॅंक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. ही महिला बॅंकेत कामासाठी गेली त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या महिलेला लॉकर एग्रीमेंट रिन्युअल आणि केवायसीसाठी बॅंकेने बोलावले त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला. जेव्हा महिलेने लॉकर उघडले तेव्हा प्लास्टीकच्या पिशवीत ठेवलेले 18 लाख रुपयांच्या नोटा वाळवीने खाल्ल्याचे उघडकीस आल्याचे पाहून या महिलेला मोठा धक्का बसला. महिलेने याची तक्रार बॅंक मॅनेजरला केल्यानंतर बॅंकेत खळबळ उडाली. बॅंकेतील लॉकरमध्ये अशा प्रकारे रोकड ठेवल्याने त्याला वाळवी लागण्याचे प्रकार वारंवार उघडकीस आले आहे.
बॅंकेने सुरु केली चौकशी
आशियाना कॉलनीतील निवासी अलका पाठक यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये बॅंकेच्या लॉकरमध्ये दागिने आणि 18 लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. सोमवारी त्या बॅंकेत गेल्या असता हा प्रकार समजला. अलका पाठक म्हणाल्या त्याच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये ही 18 लाख आणि दागिने बॅंकेत ठेवले होते. त्यांना माहीती नव्हते की बॅंकेच्या लॉकरमध्ये रोकड ठेवत नाहीत. अलका पाठक यांनी सांगितले की बॅंक मॅनेजरनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. यातील जी काही माहीती समोर येईल ती दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.