नवी दिल्ली : आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत देशात INDIA विरुद्ध NDA असा सामना रंगणार आहे. काल या संदर्भातील चित्र स्पष्ट झालं. बंगळुरु येथे काँग्रेस प्रणीत 26 विरोधी पक्षांची बैठक झाली. त्याचवेळी दिल्लीत भाजपप्रणीत NDA च्या 38 घटक पक्षांची बैठक संपन्न झाली. भाजपा विरोधी गटाने INDIA नाव धारण केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारला या आघाडीवर थेट टीका करताना जपून शब्द वापरावे लागतील. कारण नावामध्येच INDIA आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी ही आघाडी आकाराला आली आहे. बंगळुरुत मंगळवारी बैठक झाली. यावेळी आपल्यात भक्कम एकजूट असल्याच दाखवून देण्याचा प्रयत्न झाला.
कोण उपस्थित होतं बैठकीला?
INDIA ची पहिली बैठक बिहार पाटना येथे झाली होती. दुसरी बैठक बंगळुरु येथे संपन्न झाली. महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव हे मोठे नेते उपस्थित होते.
तिघे एकाच कारमध्ये बसले
ही बैठक झाल्यानंतर आता INDIA मध्ये धुसफूस असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बंगळुरुहून दोन दिवसीय बैठक आटोपून आल्यानंतर मीडियाला टाळलं. पाटण्याला उतरल्यानंतर तिघे मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये बसले. लालू आणि तेजस्वी यांना सर्वप्रथम 10 सर्क्युलर रोड निवासस्थानी सोडलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
संयुक्त पत्रकार परिषद टाळली
भाजपा विरोधी 26 पक्षांची बैठक झाल्यानंतरही हे तिन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषदेत दिसले नव्हते. विमान पकडायच असल्याने काही नेते संयुक्त पत्रकार परिषदेआधी निघाले असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितलं.
परतीची वेळ बदलता आली असती, पण….
“नितीश, लालू, तेजस्वी आणि अन्य जेडीयू, आरजेडी नेते चार्ट्ड विमानाने बंगळुरुत आले होते. परतीचा वेळ बदलून ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकले असते” असं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा अशाच पद्धतीने संयुक्त पत्रकार परिषद टाळली. “विरोधी पक्षाचं संयोजक पद न मिळाल्यामुळे नितीश कुमार नाराज आहेत. म्हणून त्यांनी पत्रकार परिषद टाळली” असं राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी सांगितल.