आधी स्फोटासारखा आवाज… 16 मिनिटात तीन वेळा धरणीकंप; भयभीत नागरिक जीवमूठीत घेऊन पळाले

| Updated on: Jul 21, 2023 | 6:55 AM

जयपूरमध्ये पहिला भूकंपाचा धक्का पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी जाणवला. त्यानंतर 4 वाजून 23 मिनिटांनी दुसरा तर 4 वाजून 25 मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला.

आधी स्फोटासारखा आवाज... 16 मिनिटात तीन वेळा धरणीकंप; भयभीत नागरिक जीवमूठीत घेऊन पळाले
earthquakes
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जयपूर | 21 जुलै 2023 : आज सकाळी सकाळीच भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी राजस्थान आणि मणिपूरची धरती हलली. जयपूरमध्ये 16 मिनिटाच्या आत एकापाठोपाठ एक तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.4 एवढी तीव्रता नोंदवली गेली. सकाळी सकाळीच झालेल्या या भूकंपामुळे साखर झोपेत असलेले नागरिक चांगलेच हादरून गेले. लागोपाठ तीनवेळा जमीन हादरल्याने नागरिकांना जीवमूठीत घेऊन घरातून पळ काढला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जयपूरमधील लोक चांगलेच घाबरून गेले होते.

जयपूरमध्ये पहिला भूकंपाचा धक्का पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी जाणवला. त्यानंतर 4 वाजून 23 मिनिटांनी दुसरा तर 4 वाजून 25 मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला. पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 एवढी नोंदवली गेली. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.4 आणि तिसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.4 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून घाबरून बाहेर पळाले.

हे सुद्धा वाचा

काही लोक पार्कमध्ये जाऊन बसले. तर काही लोक उघड्यावर जाऊन बसले. या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सर्वाच जण भयभीत झाले होते. आपल्या चिल्यापिल्यांसह सुरक्षित ठिकाणी जाऊन बसले होते. काही मोठा अनुचित प्रकार तर घडणार नाही ना? हीच चिंता त्यांच्या चेहऱ्यावर होती.

स्फोटाचा आवाज झाला

दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की स्फोटासारखे आवाज ऐकू आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर लोक आता भूकंप आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. या व्हिडीओममध्ये भूकंपामुळे जमीन हलताना दिसत आहे.

वसुंधरा राजे यांचं ट्विट

राजस्थानाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ट्विट करून भूकंपाची माहिती दिली. जयपूरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. तुम्ही सर्व सुरक्षित असाल अशी आशा आहे, असं या ट्विटमध्ये वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

 

मणिपूरही हादरले

मणिपूरच्या उखरूल येथे पहाटे 5 वाजता भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्र बिंदू 20 किलोमीटर आत जमिनीत होता. उखरूलमध्ये काही दिवसांपूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले होते.