श्रीनगर : बुडगावात महसूल खात्यात (Revenue Department) काम करणाऱ्या राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची गुरुवारी दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जम्मू खोऱ्यातील बुडगाव येथे राहूल आपल्या कुटुंबासोंबत राहत होता. या हत्येनंतर तीव्र जनक्षोभ उसळला असून पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. काश्मीर खोऱ्यात पुनः एकदा काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) लक्ष्य केले जात आसल्याचे यातून उघड झाले आहे. तर या हत्येच्या निषेधार्थ 350 सरकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आपआपले राजीनामे दिले. सर्वांनी आपले राजीनामे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याकडे पाठवले आहेत. हे सर्व काश्मिरी पंडित पंतप्रधान पॅकेजचे कर्मचारी आहेत. सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी (Terrorist) हत्या केल्यानंतर खोऱ्यात त्यांना असुरक्षित वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ते राहुल भट्टच्या हत्येच्या निषेधार्थ लाल चौकात आंदोलन करणार आहेत.
तत्पूर्वी, काश्मिरी पंडितांनी सकाळी जम्मू-अखनूर जुना महामार्ग रोखून धरला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी आठ काश्मिरी पंडितांना ताब्यात घेतले. त्याचवेळी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये चार जण जखमी झाले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना विमानतळाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ट्विटरवर लिहिले की, त्यांनी राहुल भट्ट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या दु:खाच्या काळात सरकार राहुलच्या कुटुंबियांसोबत आहे. दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना त्यांच्या या कृत्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
दुसरीकडे, राहुल भट्ट यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना आणि जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांना काश्मिरी पंडितांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. काश्मिरी पंडितांनी दोघांचा घेराव करून घोषणाबाजी केली. संतप्त काश्मिरी पंडितांनी मोदी सरकारविरोधातही घोषणाबाजी केली.
सरकारवर टीका करताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, हनुमान चालिसा पठण करून आणि लाऊडस्पीकर हटवून काश्मिरी पंडितांचे प्रश्न सुटणार नाहीत. ही समस्या संपवायची असेल, तर केंद्र सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच ते म्हणाले की, तुम्ही किती दिवस पाकिस्तानकडे बोटे दाखवत राहणार आणि दोष देत राहणार.
राहुल भट्टची पत्नी मीनाक्षी यांनी आजतकला सांगितले की, राहुलला चदूरामध्ये असुरक्षित वाटत आहे. दोन वर्षांपासून ते स्थानिक प्रशासनाकडे आपली बदली ही मुख्यालयात करण्यासाठी आवाहन करत होते. मीनाक्षीने सांगितले की, काश्मीरमध्ये दोन शिक्षकांची हत्या झाली तेव्हाही राहुलने सुरक्षेसाठी बदली मागितली होती, पण त्यांची बदली करण्यात आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आपल्या राजकारणासाठी काश्मिरी पंडितांना बळीचा बकरा बनवत असल्याचेही राहुल भट्टची पत्नी मीनाक्षी यांनी सांगितले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी काश्मीरमध्ये येऊन सुरक्षेशिवाय फिरून दाखवावे असे आवाहन केले. तर काश्मिरी पंडितांचा छळ होत आहे. मात्र संपूर्ण देशात शांत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही.
मीनाक्षी म्हणाल्या, दहशतवादी आमच्याकडून सरकारच्या हट्टाचा बदला घेत आहेत. राहुलच्या मारेकऱ्यांना दोन दिवसांत ठार करा. त्यांनी सांगितले की, लष्कराने सांगितले आहे की, आम्ही दोन दिवसांत दहशतवाद्यांना बिळातून काढून मारू. पण हे लोक या दहशतवाद्यांना आधीच का मारत नाहीत, सुरक्षा का ठेवत नाहीत. असा सवाल ही उपस्थित केला. तसेच माझ्या त्यांनी पतीची हत्या केली आहे, आता आम्ही दहशतवाद्यांना मारणार असेही त्या म्हणाल्या.
मीनाक्षी भट्ट यांनी सांगितले की, दहशतवादी तहसीलमध्ये घुसले आणि राहुल भट्ट कोण आहे असे विचारले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना हलण्याची संधीही देण्यात आली नाही. एवढेच नाही तर आतीलच कोणीतरी कर्मचारी त्या दहशतवाद्यांना मिळालेला असेल. तेव्हाच तिच्या पतीचे नाव दहशतवाद्यांना कळले असणार असा संशय तिने व्यक्त केला आहे. राहुल यांच्या कार्यालयातील काही लोक दहशतवाद्यांसोबत या कटात सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मीनाक्षीने आज तकला सांगितले की, तिच्या पतीशी 10 मिनिटांपूर्वीच बोलणे झाले होते. ते म्हणाले होते की, लवकर येतोय आपण वाढदिवसाला जाऊ, मात्र त्यानंतर मला कळले की दहशतवाद्यांनी त्यांनी गोळ्या घातल्या.