PM Modi 78th Independence Day Speech : वैद्यकीय शिक्षणासाठी 75 हजार जागा वाढवणार- पंतप्रधान मोदींची महत्वपूर्ण घोषणा
संपूर्ण देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात 'हर घर तिरंगा' मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधित केले. त्यांच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा होत्या.
भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांशी संवाद साधत त्यांना संबोधित केलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण त्यांनी केले. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ‘ पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. 2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे’ असं पीएम मोदी म्हणाले
पंतप्रधानांकडून महत्वाची घोषणा
डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं. त्यासाठी त्यांना कुठल्याही देशांमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं. मात्र त्यासाठी त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. त्यामुळे आता येत्या 5 वर्षांत 75,000 जागा वाढवण्यात येतील, असं सरकारनं निश्चित केल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
#WATCH | During his #IndependenceDay2024 speech, PM Modi announces, “In the next five years, 75,000 new seats will be created in medical colleges in India. Viksit Bharat 2047 should also be ‘Swasth Bharat’ and for this, we have started Rashtriya Poshan Mission.” pic.twitter.com/IvVLVYPGKK
— ANI (@ANI) August 15, 2024
पंतप्रधान म्हणाले, “वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुलं देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत, यासाठी त्यांचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. दरवर्षी 25 हजार विद्यार्थी मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जातात. त्यामुळं गेल्या 10वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या 1 लाख केल्या. त्यामुळं आम्ही हे निश्चित केलं आहे की येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात 75 हजार नव्या जागा तयार केल्या जातील” असं त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे :
– स्वातंत्र्य मिळाले पण प्रत्येक सुविधेसाठी लोकांना सरकारकडे हात पसरावे लागले होते. मात्र आज सरकार घरोघरी नळाचे पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.
– स्पेस सेक्टर एक भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायवेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच निर्माण आणि सामन्य माणसासाठी इज ऑफ लिव्हिंगवर भर दिला आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
– मध्यमवर्गीय देशाला भरपूर काही देतो. त्यामुळे देशाची पण त्याच्याप्रती जबाबदारी आहे. मी स्वप्न बघितलय 2047 पर्यंत लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. गरज असेल तेव्हा सरकार तिथे असेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
– आम्ही देशवासीयांसाठी 1500 हून जास्त कायदे रद्द केले, जेणेकरून लोक या गोंधळात अडकू नयेत. छोट्या छोट्या कारणांसाठी तुरुंगात जावं लागत होतं, ते कायदेही आम्ही रद्द केले. कित्येक वर्षांपासून आपल्याकडे जे गुन्हेगारी कायदे होते, ते आम्ही बदलले असं पंतप्रधानांनी नमूद केलं. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे गुन्हेगारी कायदे होते. आता आम्ही न्यायसंहिता आणली आहे. आता दंड नव्हे तर न्यायाच्या भावनेला तयार केलं आहे,असं ते म्हणाले.
– विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांची आवड वाढली आहे. ही आवड योग्य दिशेने नेण्यासाठी संस्थांना पुढे यावे लागेल. संशोधनासाठी सरकारने मदत वाढवली आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात 1 लाख कोटी रुपयांचा निधी आम्ही संशोधन आणि विकासासाठी दिला आहे.
सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा, पंतप्रधानांचे आवाहन
आपण मिशन मोडवर इज ऑफ लिंव्हिंगसाठी काम केलं पाहिजे, असं मी लोकप्रतिनिधींना आवाहन करतो . युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला भेडसावणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपायांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे.