लहान वयात केला चमत्कार, मृत्यूनंतरही राहिल ‘जिवंत’, सरकारने दिला गार्ड ऑफ ऑनर
भुवनेश्वर येथील सुभाजीत हा 8 वरच मुलगा इयत्ता दुसरीत शिकत होता. शाळेत परीक्षा देत असताना सुभाजीत याला मेंदूचा (ब्रेन डेड) झटका आला. सुभाजीतला तातडीने जवळच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण,
ओडिशा | 5 मार्च 2024 : जिथे मोठी माणसे जे धाडस दाखवू शकत नाहीत असे धाडस एका 8 वर्षाच्या मुलाने दाखविले. मृत्यूशी झुंजत असतानाही त्याने दाखविलेल्या धाडसाची दखल राज्य सरकारने घेतली. त्या मुलाच्या मृत्युनंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मुलाचे नाव सुभाजीत साहू असे आहे. त्याने केलेल्या कामाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. सुभाजीत या जगात नाही पण मृत्युनंतरही तो त्याच्या कामामुळे जिवंत राहिल. पोलिस आयुक्त संजीव पांडा आणि डीसीपी प्रतीक सिंग यांच्या उपस्थितीत सत्यनगर स्मशानभूमीत सुभाजित साहू यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
भुवनेश्वर येथील सुभाजीत हा 8 वरच मुलगा इयत्ता दुसरीत शिकत होता. शाळेत परीक्षा देत असताना सुभाजीत याला मेंदूचा (ब्रेन डेड) झटका आला. सुभाजीतला तातडीने जवळच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्याला नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे सुभाजीत कोमात गेला.
कोमात गेलेल्या सुभाजीतवर उपचार सुरु होते. पण, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. सुभाजीत याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सुभाजीतच्या या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचले. सुभाजीतचे वडील विश्वजित साहू म्हणाले की, आम्ही सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवू शकलो नाही. त्यामुळे आम्ही त्याचे मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, डोळे, हृदय आणि स्वादुपिंड यासह सर्व अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
मला माझ्या शूर मुलाचा खूप अभिमान आहे. ज्याने आपल्या अवयवांनी अनेकांचे प्राण वाचवले. आता आम्ही स्वतःचे सांत्वन करू शकतो की आमच्या मुलाने इतरांचे प्राण वाचवले. आता तो त्यांच्या रुपामध्ये जगेल, असे वडील विश्वजित साहू यांनी सांगितले. तर, सुभाजीत याची आई सुभाषश्री यांनी ‘तो केवळ आठ वर्षांचा असताना त्याने असे उदात्त कार्य केले आहे जे 80 वर्षांचा माणूसही करू शकत नाही, असे म्हटले.
सुभाजीत याच्यावर भुवनेश्वरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवयवदात्यांसाठी राज्य सरकारने केलेल्या नव्या धोरणानुसार सुभाजीत याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यामुळे अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.