हरियाणा : रोहतक येथे एक घटना समोर आली आहे, जी देशभर चर्चेचा विषय बनली आहे. येथील एका 102 वर्षाच्या आजोबांनी डोक्याला बाशिंग बांधले, डोळ्यावर चष्मा लावून वरात काढली, पण त्यांचे लग्न (Marriage)च झाले नाही. आश्चर्यचकित झालात ना ! खरं तर हे 102 वर्षांचे लग्नासाठी घोडीवर स्वार नाही झाले, तर आपली एक मागणी (Demand) पूर्ण करून सरकार आणि व्यवस्थेची खरडपट्टी काढण्यासाठी असे केले. दुलीचंद (Dulichand) असे या आजोबांचे नाव असून ते रोहतकच्या गांधार गावचे रहिवासी आहेत.
वास्तविक, दुलीचंद यांना हरियाणा सरकारने कागदोपत्री मृत घोषित केले होते. त्यामुळे त्यांची पेन्शनही बंद झाली. दुलीचंद हे पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चकरा मारत आहेत. त्यांची शेवटची पेन्शन मार्च महिन्यात आली होती. त्यानंतर 7 महिन्यांपासून त्यांना पेन्शन मिळालेली नाही.
व्यथित झालेल्या दुलीचंद यांनी स्वतःला जिवंत सिद्ध करण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला आणि त्यांनी स्वतःची वरात काढली. यावेळी नवरदेवाप्रमाणे सजलेल्या दुलीचंद यांनी हातात एक फलकही घेतला होता. या फलकावर सरकारला घेरत उपरोधिक टोला मारला होता आणि लिहिलं होतं… थारा फुफा अभी जिंदा है…
दुलीचंद यांनी बुधवारी पत्रकार परिषदही घेतली होती. पेन्शनसाठी अधिकाऱ्यांकडे चकराही मारल्या. मात्र त्यांची कुठेही सुनावणी झाली नसल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, आता मी जिवंत आहे, मेलो नाही. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते नवीन जयहिंदही दुलीचंद यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले.
नवीन म्हणाले की, हरियाणात एवढ्या वयाचे लोक कमी आहेत, त्यामुळे त्यांना राज्याचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले पाहिजे. वृद्ध दुलीचंद यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, कौटुंबिक ओळखपत्र आणि बँक स्टेटमेंट दाखवत जयहिंद यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की, या वृद्धाला पेन्शन देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का ?, त्यामुळे त्यांना मृत दाखवून त्यांचे पेन्शन बंद केले जात आहे.