छत्तीसगड : व्यावसायिक नुकसानी (Loss)मुळे आलेल्या नैराश्येतून एका तरुणाने आई, भाऊ आणि बहिण यांच्यावर जीवघेणा हल्ला (Attack) करत स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याची घटना छत्तीसगडमधील बस्तरमध्ये उघडकीस आली आहे. सुरेंद्र कच्छ असे हल्ला करणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर राधिका कच्छ, कृष्णा कच्छ आणि सरिता कच्छ अशी हल्ला करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या हल्ल्यात आई राधिकाचा जागीच मृत्यू झाला. भाऊ आणि बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना काँग्रेसचे माजी आमदार मन्नुराम कच्छ यांचे मोठे बंधू सुखराम कच्छ यांच्या टोकापल येथील निवासस्थानी घडली. याप्रकरणी बस्तर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सुरेंद्र कच्छ यांचा पेट्रोल पंपचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांना खूप नुकसान झाले होते. यामुळे ते तणावात होते. याच तणावातून त्याने कोयत्याने आई, बहिण आणि भावावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ आणि बहिण गंभीर जखमी झाले. जखमी भावा-बहिणीला रुममध्ये बंद आरोपी सुरेंद्रने स्वतः आत्महत्या केली. भावा-बहिणीचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी दोघांना जखमींना डिमरापाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिण सरीताची पोलिसांनी विचारपूस केली असता तिने व्यावसायिक तणावातून भावाने हे कृत्य केल्याचे सांगितले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कच्छ परिवाराचे डिलमिली आणि गीदाम रोडवर पेट्रोल पंप आहेत. यावरुन घरात वाद सुरु होते. याच वादातून आणि व्यावसायिक नुकसानीतून मोठा मुलगा सुरेंद्रने हे हत्याकांड केले आणि स्वतःही आत्महत्या करत आपले जीवन संपवले.