आप पक्षाचे नेते ‘गुरू’वरच पलटले, त्यावेळी गप्प का होते? अण्णा हजारे यांना केला सवाल…
Arvind Kejriwal : केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांचे जुने सहकारी आणि गुरू जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली. 'त्यांच्या कर्माचे फळ' असे हजारे यांनी म्हटले. अण्णा हजारे यांच्या त्या वक्तव्यावरून आप पक्षाच्या नेत्यांनी पलटवार केला आहे.
नवी दिल्ली : आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर ईडीने केजरीवाल यांची चौकशी करून नंतर अटक केली. केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने 6 दिवसांची ईडी कोठडी ठोठावली आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांचे जुने सहकारी आणि गुरू जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. ‘त्यांच्या कर्माचे फळ’ असे हजारे यांनी म्हटले. अण्णा हजारे यांच्या त्या वक्तव्यावरून आप पक्षाच्या नेत्यांनी पलटवार केला आहे. ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कधीही काहीही बोलत नाहीत, अशी टीका आपने केली आहे.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी टीका केली होती. ‘मी त्यांना असे धोरण बनवू नये असे सांगितले होते. आमचे काम अबकारी धोरण बनवणे नाही. यातून त्यांना जास्त पैसे कमावतील असे वाटत होते म्हणून त्यांनी हे धोरण बनवले. मला वाईट वाटले, त्यामुळे मी दोनदा पत्रे लिहिली. एकेकाळी माझ्यासोबत काम करून दारूविरोधात आवाज उठवणारा केजरीवाल यांच्यासारखा माणूस अबकारी धोरण बनवत आहे याचे मला वाईट वाटले. दारू वाईट आहे हे अगदी लहान मुलालाही माहीत असते. त्यांच्या कर्माचे हे फळ आहे.’ असे अण्णा हजारे म्हणाले होते.
केजरीवाल यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्ष चांगलाच संतापला आहे. त्यातच अण्णा हजारे यांनी केलेली टीका पक्षाला चांगलीच झोंबली. आपचे नेते दिलीप पांडे यांनी यावरून अण्णा हजारे यांच्यावरच हल्लाबोल केलाय. अण्णा हजारे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कधीही काहीही बोलत नाहीत. त्यांचे वक्तव्य दुःखद आहे. यामुळे आपले मन दुखावले असे ते म्हणाले.
भाजपने हिमंता बिस्वा सरमा यांच्याविरोधात मतदार घोटाळ्याची मोहीम सुरू केली. सरमा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्या घोटाळ्या विरोधातील आवाज बंद झाला. भाजपने अजित पवारांवर सर्व प्रकारचे आरोप केले. त्यानंतर ते भाजपसोबत आले. त्यांच्याही विरोधातील आवाज बंद झाला. या विरोधात अण्णा हजारे काही बोलत नाहीत, हे विचित्र आहे अशी टीका दिलीप पांडे यांनी केली.
दरम्यान, भाजप नेते खासदार मनोज तिवारी यांनी, दिल्लीतील जनता इतकी संतप्त आहे की त्यांच्या अटकेनंतर दिल्लीत मिठाई वाटण्यात आली असा टोला लगावला आहे. त्यांनी जनतेला लुटून स्वत:साठी राजवाडा बांधला. केजरीवालजींनी दिल्ली लुटली आहे. त्यांच्या मनात भ्रष्टाचाराचे विचार असू शकतात असेही ते म्हणाले.