गुजरात राज्याचा असा डॉन ज्याच्यामुळे दाऊदलाही फुटला घाम! कोण होता तो? वाचा
कहाणी गुजरातमधील अशा डॉनची ज्याने जेलमध्ये शिक्षा भोगली आणि नंतर निवडणूक फक्त लढवली नाही, तर जिंकलीही
गुजरातच्या विधानसभा निवडणुकांना आता काही दिवसच बाकी राहिले आहेत. अशातच गुजरातमध्ये निवडणूक (Gujrat Assembly Elections 2022) लढवून ती जिंकून दाखवणाऱ्या डॉनबाबत आज जाणून घेणार आहोत. फक्त ही निवडणूक विधानसभेची नाही, तर महापालिकेची होती, इतकाच काय तो फरक! हा डॉन गुजरातमध्ये (Gujrat Don Abdul Latif) तर कुप्रसिद्ध होताच. पण क्रिमिनल लिस्टमध्येही (Gujrat Crime News) त्याचं नाव होतं. शिवाय या गुजरातच्या डॉनमुळे दाऊद इब्राहिमलाही घाम फुटला होता. दादागिरी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या राजकीय नेत्यांची ओळख म्हणून बिहार किंवा उत्तर प्रदेश या राज्यांकडे पाहिलं जातं. पण गुजरातही तशाच राज्यांमध्ये मोडतं, हे या डॉनची कहाणी वाचल्यावर अधोरेखित होतं. गुजरातमध्ये असलेल्या या डॉनचं नाव होतं अब्दुल लतीफ.
गुजरातचा डॉन म्हणून ज्याचा अनेकदा उल्लेख केला जातो, त्या अब्दुल लतीफचा जन्म झाला अहमदाबादच्या दरीयापूरमध्ये भागात. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आठ भाऊ-बहिण असणाऱ्या कुटुंबात अब्दुलचे वडील कसंतरी करुन संसाराचा गाडा हाकत होते.
अब्दुलला खरंतर शिकायचं होतं. पण घरची परिस्थिती शिक्षणाच्या आड आली. तो 12 वी पर्यंतच शिकू शकला. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सुटलं. पण घरातल्या गरिबीने अब्दुलने प्रणच केला. काहीही झालं तरी पुढचं आयुष्य गरिबीत जगायचं नाही, अशी त्याने शपथच घेतली.
अब्दुलसमोर दोन पर्याय होते. एकतर मेहनत करायची, चांगल्या मार्गाने कुटुंबाला सधन बनवायचं. पैसे कमावयाचे, पण चांगल्या गोष्टी करुन. पण हा पर्याय अब्दुलने पत्करण्याऐवजी चुकीचा मार्ग अवलंबला. त्याने जो रस्ता गरिबी मिटवण्यासाठी निवडला होता, त्याने अब्दुल लतिफ पैसेवाला माणूस झाला खरा. पण ते काम बेकायदेशीर आणि घातक होतं.
अब्दुल लतीफ याने सत्तरच्या दशकात गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. बेकायदेशीरपणे दारू पोहोचवण्याचं काम तो करु लागला. ऐंशीच्या दशकात दारुचा धंदा गुजरातमध्ये फॉर्मात होता. अब्दुलला या धंद्यातील फायदा खुणावत होता. अब्दुलने हे काम करणं सुरु केलं.
फक्त गुजरात नाही तर राजस्थानातही अब्दुलने दारुच्या भट्ट्या सुरु केला. त्यात पैसे गुंतवले. त्याला हा धंदा मोठा करायचा होता. वेगवेगळ्या राज्यात अवैध दारु धंद्याचं जाळं त्याला पसरवायचं होतं. आता तर कमाईदेखील बक्कळ होऊ लागली होती. पण ही फक्त सुरवात होती. अजून अब्दुल लतिफ डॉन बनणं बाकी होतं.
अब्दुल लतिफ हे नाव बघता बघता गुन्हेगारी विश्वात परिचयाचं झालं. हा माणूस उद्या आपल्यालाच अडचणीचा ठरु शकतो, असं तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही वाटलं असल्याचंही बोललं जातं. कारण दारुच्या बेकायदेशीर धंद्यानंतर अब्दुल लतिफची नजर शस्त्रांच्या स्मगलिंगवर पडली होती.
अब्दुलचा लतिफचा पाय आणखी खोलात जात होता. दारुच्या अवैध धंद्यापासून सुरुवात केलेल्या अब्दुलने आता एकापेक्षा एक गुन्हेगाऱ्यांना हाताशी धरलं. शस्त्रांच्या देवाणघेवणीने अब्दुलचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. ना त्याला पोलिसांची भीती वाटत होती आणि ना कायद्याचं भय. हत्या, अपहरण, खंडणी, या आणि अशा अनेक गंभीर गुन्ह्यात अब्दुल लतिफ विरोधात तक्रारी दाखल झाल्या होता.
ऐंशीचं दशक संपेपर्यंत अब्दुल लतिफ हे नाव कुख्यात गुंड आणि गुजरातचा डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. गुन्हेगारांचा माफिया म्हणून अब्दुल लतिफकडे पाहिलं जातंय. चुकीच्या कामातून अब्दुल लतिफ याने पैसे कमावले.
पण नंतर त्याने हेच पैसे गरिबीत जगणाऱ्या आणि समाजातील काही गरजू लोकांमध्ये खर्च करण्यासही सुरुवात केली होती. मुलींची लग्न लावणं, लोकांना कर्ज फेडण्यासाठी मदत करणं, उपेक्षिकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं, अशी कामंही अब्दुल लतिफ याने केली.
या सामाजिक कामांमुळे अहमदाबादमध्ये अब्दुल लतिफ याचा चाहता वर्ग तयार झाला. आपल्याला मिळणारं समर्थन पाहून अब्दुल लतिफ हा शिक्षा भोगून जेव्हा परतला, तेव्हा त्याने राजकारणात पाऊल ठेवायचं ठरवलं, ते यासाठीच!
साल होतं 1986-1987. गुजरातमध्ये पालिका निवडणुकांचा तो काळ होता. अब्दुल लतिफ याने आपले पाच उमेदवार रिंगणात उतरवले. विशेष म्हणजे हे पाचही उमेदवार निवडणूक जिंकले. कालूपूर, शाहपूर, दरीयापूर, जमालपूर आणि राखांडा नगरपालिकेतील जागांवर गुजरातच्या डॉनचा दबदबा निर्माण झाला.
राजकारणात येऊनही अब्दुल लतिफचं गुन्हेगारी विश्वासचं असलेलं नातं तुटलेलं नव्हतं. 1990 मध्ये गुजरातमध्ये अब्दुलची ताकद इतकी वाढली की मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही तो खटकू लागला. दोघांनीही एकमेकांना पाण्यात पाहायला सुरुवात केली. शत्रूत्व वाढेल अशी शंका होती. पण झालं उलटच.
अब्दुल लतिफ याने दाऊद इब्राहिमच्या एका शत्रूला आश्रय दिलेला. शत्रूचा शत्रू दोस्त असं म्हणतात. पण अब्दुलच्या बाबतीत ते खोटं ठरलं. स्टाईलीश आयुष्य जगणाऱ्या अब्दुलची ताकद दाऊदही ओळखून होता.
नेहमी हातात सिगरेट, सोबत एक सफेद फियाट कार अब्दुल लतिफची ओळख बनली होती. गुजरात निवडणूक जिंकल्यानंतर अब्दुल लतिफ आणखीच पॉवरफुल झाला होता. सुप्रीम कोर्टातूनही पुढे त्याला जामीन मंजूर झाला.
नव्वदीचा काळ सुरु होत असतानाच दाऊदने अब्दुल लतिफ याला दुबईत बोलावून घेतलं. ही भेट यशस्वी ठरली आणि दोघांमधील कटुता संपुष्टांत आली. जुने शत्रू आता एकमेकांचे मित्र बनले होते.
दाऊद आणि अब्दुल यांच्यातील मैत्री मुंबईतील आणखी एक गँगस्टर शहजादा याच्या नजरेत भरली होती. दुबईतून परल्यानंतर शहजादा आणि अब्दुल यांच्यातील टोळीयुद्धाने दहशत माजवली होती. त्याच्या अनेक बातम्याही समोर येत असत.
एका गँगस्टर शहजादा हा गुजरातमध्ये आला होता. दारुचा धंदा करणाऱ्या हंजराजसोबत तो राधिका जिमखान्यात बसलेला. ही टीप लागताच अब्दुल लतिफ याने शहजादावर हल्ला चढवला. अब्दुलच्या माणसांनी येऊन तिथं गोळीबार केला. यात शहजादा तर ठार मारला गेलाच. पण त्याच्यासकट अन्य 9 जणही मारले गेले.
या घटनेनं सगळेच हादरुन गेले. हे काम अब्दुलनेच केल्याची पोलिसांना खात्री होती. पोलीस आता अब्दुलच्या मागावर होते. अब्दुलही पोलिसांपासून वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होता. शक्य त्या ठिकामणी काही काळ लपून दिवस घालवत होता. याच वेळा दाऊदने अब्दुलची मदत केली. अब्दुल दुबईला पळून गेला. पण या उपकारांची परतफेड अब्दुलने एका काँग्रेस नेत्या हत्येनं केली.
दुबईत केल्यानंतर अब्दुल लतिफ याने काँग्रेस नेते रऊफ वल्लीउल्लाह यांच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर 1992 साली अब्दुलच्या गँगमधीलच दोन शार्प शुटर्स रऊफ वल्लीउल्लाह यांच्यावर निशाणा ठेवून होते. त्यांनी काँग्रेस नेते रऊफ यांची गोळ्या झाडून हत्या केली.
अब्दुलच्या पापाचा घडा आता भरत चालला होता. गुजरातमध्ये परतणं त्याच्यासाठी शक्यच नव्हतं. अब्दुलवर टाडा आणि रासुका सारखे गुन्हे दाखल झाले होते. तो देश सोडून दुबईतच राहत होते. मधल्या काळात त्याने पाकिस्तानात जाऊन टायगर मेमन याचीही भेट घेतली होती.
1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब हल्ल्यात हत्यारं पोहोचवण्याच्या कामात अब्दुलनेच दाऊदला मदत केल्याचंही बोललं जातं. मुंबई हल्ल्यानंतर तो थेट पोलिसांच्या आणि एटीएसच्या टार्गेटवर आला. अब्दुल पाकिस्तानत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण 1995 साली अब्दुल लतिफ याला एटीएसने दिल्लीतून बेड्या ठोकल्या.
गुजरातमधीलच साबरमती जेलमध्ये अब्दुलची रवानगी करण्यात आली. दोन वर्ष त्याने तुरुंगवास फोगला. पण 29 नोव्हेंबर 1997 साली त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. ही चूक त्याच्या जीवावर बेतली.
पोलिसांनी अब्दुल लतिफ याचा एन्काऊन्टरमध्ये खात्मा केली. कुणासाठी एकेकाळी मदतगार ठरलेला अब्दुल गुजरातच्या राजकारण नाव करेल, असं तेव्हा अनेकांना वाटलं होतं. पण अखेरच्या क्षणी आपल्याच देशाच्या विरोधात त्यानं केलेल्या कृत्यांनी त्याला यमसदनी धाडलं. दाऊद इब्राहिमशी भेटल्यानंतर अब्दुलचं आयुष्यच पालटलं आणि त्याचा शेवटही त्यांच्या आयुष्याप्रमाणेच झाला. निर्दयी!