चेन्नई : 28 डिसेंबर 2023 | अभिनेते, राजकारणी आणि डीएमडीकेचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचं निधन झालं आहे. त्यांच्या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्यांना नियमित आरोग्याच्या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केल्याचं डीएमडीकेकडून सांगण्यात आलं होतं. विजयकांत हे निरोगी असून काही चाचण्यांनंतर ते घरी परतणार असल्याचं पार्टीने सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा कोव्हिड-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. अखेर आज (गुरुवार) रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं असून त्यांच्या निधनाविषयीची माहिती देण्यात आली.
“न्युमोनियामुळे विजयकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मेडिकल स्टाफच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतर अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला”, अशी माहिती MIOT रुग्णालयाने दिली. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित सहवेदना व्यक्त केल्या. ‘आम्ही एका रत्नाला गमावलंय. आमचे कॅप्टन, आमचे विजयकांत. सर, तुमच्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
डीएमडीकेचे प्रमुख 20 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. या महिन्यातच ते रुग्णालयातून घरी परतले होते. विजयकांत यांचं फिल्मी करिअरसुद्धा दमदार होतं. त्यांनी बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. आजवर त्यांनी तब्बल 154 चित्रपटांमध्ये काम केलंय. चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी डीएमडीके या पक्षाची स्थापना केली. विरुधाचलम आणि ऋषीवंडियम या मतदारसंघांचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं.
2011 ते 2016 या कालावधीत त्यांचं राजकीय करिअर उंचावर होतं. त्यावेळी ते तमिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेता बनले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना राजकारणापासून लांब राहावं लागलं होतं. आजारपणामुळे ते गेल्या चार ते पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांची पत्नी प्रेमलता यांनी 14 डिसेंबर रोजी औपचारिकरित्या डीएमडीकेची सूत्रे हाती घेतली.